५० हजार कोटींच्या रोजगार योजनेचा उद्या प्रारंभ; सहा राज्ये लाभार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 03:27 AM2020-06-19T03:27:18+5:302020-06-19T07:05:55+5:30
११६ जिल्ह्यांत स्थलांतरित कामगारांना मिळेल काम
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर विविध राज्यांतून आपापल्या घरी परतलेल्या स्थलांतरित कामगारांच्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून पंतप्रधान मोदी हे शनिवारी ५० हजार कोटी रुपयांची रोजगार योजना सुरू करणार आहेत.
या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ असे असून, ती प्रामुख्याने प्रारंभी सहा राज्यांत राबवली जाईल. या सहा राज्यांत बहुतांश स्थलांतरित कामगार परतले आहेत. या योजनेतून ग्रामीण भागांत फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामे केली जातील. त्यातून १२५ दिवस स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत येथे सांगितले. मोदी या योजनेचा प्रारंभ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यातील तेलिहार खेड्यात त्याची सुरुवात होईल. या योजनेत पश्चिम बंगालचा समावेश का नाही, असे विचारले असता ग्रामीण विकास सचिव एन.एन. सिन्हा म्हणाले, जेव्हा हा कार्यक्रम बनवण्यात आला तेव्हा प. बंगालने त्यांच्याकडे किती स्थलांतरित कामगार आले याची माहितीच दिली नव्हती. २५ हजार स्थलांतरित कामगार असलेला कोणताही जिल्हा या योजनेत सहभागी होऊ शकतो. जर आमच्याकडे पुरेशी संख्या आली, तर आम्ही त्यांचा त्यात समावेश करू, असेही ते म्हणाले.
बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, ओदिशाचा समावेश
बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओदिशा राज्यांतील (प्रत्येकी २५ हजार स्थलांतरित कामगार) ११६ जिल्ह्यांची या मोहिमेसाठी निवड झाली आहे, असे सीतारामन म्हणाल्या. या जिल्ह्यांत एकूण स्थलांतरित कामगारांपैकी दोनतृतीयांश कामगार आहेत.
या योजनेतून १२५ दिवस स्थलांतरित कामगारांना रोजगार देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची २५ कामे केली जातील. रोजगार देण्यासह ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचाही उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.