कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचा निधी उभारणार - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:03 AM2020-08-10T04:03:41+5:302020-08-10T04:03:58+5:30
फायदा काय? ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार
नवी दिल्ली : देशातील लहान शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे गावांमध्ये पीक कापणीनंतर लागणाºया सुविधा व रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.
भगवान बलराम जयंतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काही योजनांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी घोषणा केली. या कार्यक्रमात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर तसेच काही शेतकरी सहभागी झाले होते.
साडेआठ कोटी शेतकºयांना दिले १७ हजार कोटी
मोदी यांनी सांगितले की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत १७ हजार कोटी रुपये थेट साडेआठ कोटी शेतकºयांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले आहेत. दलालांना टाळून व कोणालाही कमिशन न देता व्यवहार पूर्ण करता आले पाहिजेत हा उद्देश सफल झाला आहे. दीड वर्षात या योजनेच्या अंतर्गत ७५ हजार कोटी रुपये शेतकºयांच्या बँकखात्यात जमा झाले. त्यातील २ हजार कोटी रुपये शेतकºयांना कोरोना साथीच्या काळात देण्यात आले आहेत.
या निधीतून काय मिळेल?
गावांमध्ये अन्नधान्य साठवणुकीसाठी अत्याधुनिक गोदामे
व कोल्ड स्टोअरेज बांधली जातील. रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
ग्रामीण भागात कृषी क्षेत्रामध्ये स्टार्ट-अप कंपन्या सुरू करण्याचीही सुसंधी मिळेल. कृषी पतसंस्था, शेतकरी समित्या, कृषी उद्योजक आदींना विविध वित्त संस्थांच्या माध्यमातून हे १ लाख कोटी रुपये कर्ज म्हणून वितरित करण्यात येतील.
प्रकल्पांची व्यवहार्यता वाढविण्यासाठी ३ टक्के व्याज अधिग्रहण व दोन कोटी रुपयांपर्यंतची पतहमी मिळेल. यंदा १० हजार कोटी तर पुढील तीन वर्षांत दरवर्षी ३० हजार कोटी रुपये या योजनेतून वितरित केले जातील.
थेट सौदा करण्याची मुभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेतकºयाला बाजार व बाजाराला कराच्या वर्तुळातून मुक्त केले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी कृषी उत्पादनाच्या विक्रीसाठी कुणाशीही थेट सौदा करू शकेल.