राज्यवर्धन राठोड यांच्या इशाऱ्यानंतर मोदींच्या चेहऱ्यावरील भाव बदलले; कार्यक्रम सोडून तडक निघाले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 03:50 PM2019-02-27T15:50:19+5:302019-02-27T16:06:37+5:30
विज्ञान भवनातील कार्यक्रम अर्धवट सोडून मोदी निघाले
नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळी पाकिस्ताननं भारताचं विमान पडल्याची बातमी आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी विज्ञान भवनात होते. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड तिथे पोहोचले. त्यांनी मोदींना इशारा केला. यानंतर मोदींनी लगेचच उपस्थितांना अभिवादन करत सभागृह सोडलं. यावेळी मोदींच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले होते. त्यांची भावमुद्रा अतिशय गंभीर दिसत होती.
पंतप्रधान मोदी आज सकाळी 9 च्या सुमारास दिल्लीतील विज्ञान भवनात पोहोचले. काल मध्यरात्री भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडत जैश ए मोहम्मदच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यानंतर सीमेवर वेगाने घडामोडी घडत आहेत. कालपासून पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केला. आज सकाळी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रत्यन केला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्वरित एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पोहोचले. यावेळी मोदी कार्यक्रमात असल्याने याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली. यानंतर राठोड लगेचच विज्ञान भवनात पोहोचले. त्यांनी मोदींना सूचक इशारा केला आणि मोदींनी लगेचच कार्यक्रमस्थळ सोडलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. काल मध्यरात्री भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून जैशला दणका दिला. यानंतर आज पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर देताच पाकिस्तानी विमानांनी पळ काढला. यावेळी भारताने पाकिस्तानचं एफ 16 विमान जमीनदोस्त केलं. एएनआय या वृतसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचं लढाऊ विमान जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये घुसलं. हे विमान भारतीय हवाई दलाने पाडलं आणि प्रत्युत्तरादाखल 3 किलोमीटरपर्यंत गोळीबार केला. याआधी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब टाकले होते.