इंधन दरवाढीवर मंथन; मोदींची तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:14 AM2018-10-15T09:14:03+5:302018-10-15T09:14:35+5:30
इंधन दरवाढीच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेल आणि गॅस क्षेत्रातील भारतासह जगभरातील कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) चर्चा करणार आहेत.
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. यामुळे देशातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. दरम्यान, इंधन दरवाढीच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेल आणि गॅस क्षेत्रातील भारतासह जगभरातील कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) चर्चा करणार आहेत.
या बैठकीचे आयोजन नीती आयोगाकडून करण्यात येत आहे. असे समजते की, या बैठकीत इराणवर अमेरिकेने लावलेले प्रतिबंध आणि कच्चा तेलाच्या वाढत्या किमती यावर चर्चा होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आजच्या होणाऱ्या वार्षिक बैठकीत तेल, गॅस आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत निर्यात देशांच्या संघटनेचे महासचिव मोहम्मद बारकिंदो आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित असणार आहेत.
Prime Minister Narendra Modi to meet CEOs of global oil and gas companies at 10 am today. (File pic) pic.twitter.com/f9qKZKRQRF
— ANI (@ANI) October 15, 2018
याशिवाय, बैठकीत ओएनजीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शशी शंकर, आईओसीचे अध्यक्ष संजीव सिंह, गेल इंडियाचे प्रमुख बीसी त्रिपाठी, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मुकेश कुमार शरण, ऑइल इंडियाचे अध्यक्ष उत्पल बोरा आणि भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशनचे अध्यक्ष डी राजकुमार यांचा समावेश असणार आहे. याचबरोबर, सौदी अरबचे पेट्रोलियम मंत्री खालिद ए अल फलीह, बीपीचे सीईओ बॉब डुडले, टोटलचे प्रमुख पॅट्रिक फॉयेन, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल आजच्या बैठकीत हजर राहतील अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधीची पहिली बैठक 5 जानेवारी 2016 मध्ये बोलाविली होती. यामध्ये नैसर्गिक गॅसच्या किंमतीत बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर गेल्यावर्षी 2017 मध्ये ऑक्टोबर महिन्यात यासंबंधी नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली होती.
शुल्ककपातीनंतर दरवाढ सुरुच
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत चार ऑक्टोबरला प्रतिलिटर अडीच रुपयांची कपात जाहीर केली. मात्र त्यानंतरही दररोज इंधनाच्या दरात वाढ होतच आहे.