मोदींनी शायरी गालिबच्या नावानं खपवली; जावेद अख्तर यांनी चूक पकडली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 09:33 AM2019-06-27T09:33:41+5:302019-06-27T09:34:02+5:30
मोदींच्या शायरीनंतर जावेद अख्तर यांचं ट्विट
नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केला. मोदींनी शायरीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित असलेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला. तुमचा नवा भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला जुना भारत परत द्या, अशा शब्दांत आझाद यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. आझाद यांच्या टीकेला मोदींनी काल (बुधवारी) शायरीच्या माध्यमातून उत्तर दिलं.
गालिबनं अशा (आझाद यांच्यासारख्या) माणसांसाठी म्हटलं होतं, असं म्हणत मोदींनी एक शायरी ऐकवली. 'ता उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा,' असं मोदी म्हणाले. आझाद यांना सर्व गोष्टींकडे राजकीय नजरेतून पाहण्याची सवय झाल्याचा टोला मोदींना शायरीतून लगावला. आम्ही लोकांच्या हितासाठी अनेक प्रक्रिया सोप्या केल्या आहेत, असं म्हणत मोदींनी आझाद यांना जुन्या भारतावरुन आझाद यांना काही प्रश्न विचारले. कॅबिनेटनं घेतलेले निर्णय पत्रकार परिषदेत फाडणारा, संरक्षण दलांच्या सामग्रीचा वापर सहलीसाठी करणारा जुना भारत तुम्हाला हवा आहे का, असे सवाल पंतप्रधानांनी उपस्थित केले.
The sher that the prime minister saheb has quoted in his Rajya Sabha speech is wrongly attributed to Ghalib in the Social media . Actually both the lines are not even in the proper meter .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) June 26, 2019
मोदींनी शायरीचा उल्लेख केल्यानं सभागृहात हशा पिकला. मात्र यानंतर अनेकांनी पंतप्रधानांची चूक दाखवून दिली. मोदींनी सादर केलेली शायरी मिर्झा गालिब यांनी लिहिलेलीच नसल्याच्या कमेंट अनेकांनी सोशल मीडियावर केल्या. प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनीदेखील यावर भाष्य केलं. 'पंतप्रधान साहेबांनी म्हटलेला शेर मिर्झा गालिब यांचा नाही. तर तो सोशल मीडियावरुन आलेला आहे. खरं तर या शेरमधील दोन ओळी योग्य मीटरमध्येही नाहीत,' असं अख्तर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.