PM Modi Oath-Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहांनी नाही, 'या' बड्या नेत्याने घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 08:11 PM2024-06-09T20:11:32+5:302024-06-09T20:12:38+5:30
PM Modi Oath-Taking Ceremony : आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदी यांच्यासह अन्य खासदारांनीही शपथ घेतली.
PM Modi Oath-Taking Ceremony ( Marathi News ) : आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह ६९ खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राजनाथ सिंह यांनी याआधी मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये गृहमंत्री आणि दुसऱ्या टर्ममध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम केले होते. राजनाथ सिंह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत आणि त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.
राजनाथ सिंह यांनी १९७४ मध्ये राजकीय इनिंगला सुरुवात केली आणि १९७७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९८८ मध्ये एमएलसी झाल्यानंतर ते १९९१ मध्ये यूपीचे शिक्षणमंत्री झाले. या काळात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. यानंतर ते १९९४ मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले. यानंतर १९९९ मध्ये त्यांना पहिल्यांदा केंद्रीय परिवहन मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा ड्रीम प्रोजेक्ट राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम सुरू केला. ऑक्टोबर २००० मध्ये त्यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. यावेळी ते बाराबंकीच्या हैदरगड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
मे २००३ मध्ये त्यांना केंद्रीय कृषी मंत्री आणि अन्न प्रक्रिया मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकरी कॉल सेंटर आणि शेतकरी उत्पन्न विमा योजना सुरू केली. राजनाथ सिंह डिसेंबर २००५ ते २००९ या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. यादरम्यान, २००९ मध्ये ते गाझियाबादमधून खासदार म्हणून निवडून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यानंतर या खासदारांनी घेतली शपथ
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली. चौथ्या नंबरला नितीन गडकरी यांनी शपथ घेतली. गडकरी यांच्यानंतर जे.पी.नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डा यांच्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी शपथ घेतली. चौहान यांच्यानंतर निर्मला सीतारमन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.