पंतप्रधान मोदी 20 ऑक्टोबरला घेणार केदारनाथ मंदिराचे दर्शन, जनतेलाही करणार संबोधित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 08:46 AM2017-10-19T08:46:43+5:302017-10-19T11:59:06+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 महिन्यांनंतर पुन्हा एकदा केदारनाथ येथील बाबा केदारनाथ मंदिराचे दर्शन करण्यासाठी जाणार आहेत. यावेळी केदारनाथच्या दर्शनाशिवाय पंतप्रधान मोदी केदारपुरीमधील जनतेला संबोधितदेखील करणार आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 महिन्यांनंतर पुन्हा एकदा केदारनाथ येथील बाबा केदारनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. यावेळी केदारनाथ मंदिराचे दर्शन घेण्याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी केदारपुरीमधील जनतेला संबोधितदेखील करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सभेसाठीची जोरदार तयारीदेखील सुरु आहे. मे महिन्यात भाविकांसाठी खुले करण्यात आलेले मंदिराचे द्वार आता पुन्हा बंद करण्यात येणार आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी मंदिराला पुन्हा भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दिल्लीहून देहरादूनमधील जॉलीग्रॅन्ट एअरपोर्टवर पोहोचतील. तेथून ते MI-17 हेलिकॉप्टरद्वारे थेट बाबा केदारधामला जातील. बाबा केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ते केदारपुरीमध्ये काही योजनांचा शुभारंभ करतील. यानंतर 10.40 वाजता केदारनाथमधील लोकांना संबोधित करतील आणि त्यानंतर 11.40 वाजता पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौ-याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाव्यतिरिक्त भाजपाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी स्वतः सभेच्या तयारीची जबाबदारी घेतली आहे. अजय भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सभेसाठी जवळपास 5,000 लोकं आणि भाविक सहभागी होणार आहेत. या सर्वांच्या राहण्या-खाण्या-पिण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.