चार राज्यांतील विजयानंतर मोदींची स्पेशल मीटिंग; पुढील २५ वर्षांचा विजयाचा फॉर्म्युला निश्चित!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 02:58 PM2022-03-17T14:58:27+5:302022-03-17T15:02:01+5:30
चार राज्यांतील निवडणुकीतील विजयानंतर भाजपने आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप हायकमांडने चारही राज्यांतील नेत्यांशी चर्चा केली.
नवी दिल्ली-
चार राज्यांतील निवडणुकीतील विजयानंतर भाजपने आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप हायकमांडने चारही राज्यांतील नेत्यांशी चर्चा केली. 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांच्या तयारीसाठी भाजप हायकमांड गेल्या आठवड्यापासून नियोजन करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मंत्रिमंडळाला अंतिम रूप देण्यासाठी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये अनेक बैठका घेतल्या आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचा अनेक दशकांचा राजकीय इतिहास बदलून टाकला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा निवडणूक जिंकली. पीएम मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांसारखे भाजपचे प्रमुख नेते ज्या बैठकीमध्ये सामील होते त्या सर्व बैठकांमध्ये सीएम योगी देखील सहभागी होते. 21 मार्च रोजी ते शपथ घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजप नेतृत्वाने सर्व विजयी उमेदवारांची आकडेवारी मागवली आहे, जेणेकरून मंत्र्यांची नियुक्तीसाठी विचार केला जाऊ शकेल.
पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना मंत्र दिला
काही बाबी लक्षात घेऊनच मंत्र्यांची निवड होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हायकमांडने जात आणि प्रादेशिक गणना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि ओबीसी (इतर मागासवर्गीय) यांचे योग्य प्रतिनिधित्व आणि तरुण, महिला आणि शैक्षणिक पात्रता यावर भर दिला आहे. NDTV मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, PM मोदींनी आपल्या नेत्यांना पुढील 25 वर्षे देशात भाजपाचं सरकार ठेवण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले आहे. देशाचे नेतृत्व सुनिश्चित करण्यासाठी तरुणांचं विशेष महत्त्व आहे, असं मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
खासदारांवर दिली जबाबदारी
हायकमांडने आपल्या खासदारांना त्यांच्या संबंधित संसदीय मतदारसंघातील अशी 100 मतदान केंद्रे शोधण्याचे निर्देश दिले आहेत जिथे पक्षाने निवडणुकीत चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामागची कारणं शोधून उपायही शोधावे लागतील. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना २० नवीन मंत्री मिळू शकतात. उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्यासह अकरा मंत्री निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे १५ पदे रिक्त आहेत.
माजी मंत्र्याला दिला जाणार डच्चू
खराब कामगिरीमुळे काही मंत्र्यांना बडतर्फ केले जाण्याची शक्यता आहे. जाट समुदायावर लक्ष केंद्रित करून नवीन मंत्र्यांसाठी चाचपणी केली जात आहे, ज्यांनी मायावतींच्या बहुजन समाज पक्ष (BSP) मधून निष्ठा बदलली आहे असे मानले जाते. केशव मौर्य यांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून स्वतंत्र देव सिंह आघाडीवर आहेत. बेबीरानी मौर्या यांना मोठे पद दिले जाऊ शकते. एसके शर्मा, असीम अरुण आणि राजेश्वर सिंह या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही मंत्री केलं जाण्याची शक्यता आहे.