पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'तू' म्हणून हाक मारणारी ती व्यक्ती कोण?; मुलाखतीत भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:22 IST2025-01-10T16:21:52+5:302025-01-10T16:22:54+5:30
माझं जीवन एका भटकत्या व्यक्तीसारखं होते, मला कोण विचारणार..पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या मनात काही इच्छा निर्माण झाल्या असं मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'तू' म्हणून हाक मारणारी ती व्यक्ती कोण?; मुलाखतीत भावूक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यात स्वत:चं लहानपण आणि बालपणाचे मित्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. आता माझा कुणी मित्र नाही, त्याशिवाय असेही कुणी नाही जे मला तू म्हणून हाक मारतील. माझे एक शिक्षक होते, जे मला पत्र लिहायचे, ते मला नेहमी तू म्हणून बोलायचे परंतु आता ते या जगात नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझे शिक्षक होते ज्यांचं नाव रासबिहारी मणियार असं होते. ते जेव्हाही मला पत्र पाठवायचे त्यात नेहमी तू असं संबोधायचे. परंतु अलीकडेच वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. रासबिहारी मणियार एकमेव व्यक्ती होते जे मला तू म्हणून बोलवायचे. मी खूप कमी वयात घर सोडले होते त्यामुळे माझा शाळेतील मित्रांशी संपर्क नव्हता. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा शाळेतील मित्रांना बोलवले परंतु त्यांच्याशी बोलताना मैत्री दिसली नाही कारण त्यांच्या नजरेत मी मुख्यमंत्री होतो मात्र मी त्यांच्यात मित्र शोधत होतो असं त्यांनी म्हटलं.
तसेच माझं आयुष्य थोडं विचित्र आहे. मी लहान वयात घर सोडले होते. सर्वकाही सोडले कुणाशी संपर्क नव्हता. माझं जीवन एका भटकत्या व्यक्तीसारखं होते, मला कोण विचारणार..पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या मनात काही इच्छा निर्माण झाल्या. त्यात माझ्या वर्गातील जितके जुने मित्र होते त्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी बोलवू. यामागे माझी मानसिकता अशी होती. माझ्यासोबतच्या कुठल्याही व्यक्तीला असं वाटू नये की मी खूप मोठा माणूस झालोय, मी तोच होतो जो गाव सोडून आलो होतो. माझ्यात बदल झाला नाही ते क्षण मला जगायचे होते असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, आयुष्य असेच जगायचं आहे, मी माझ्या मित्रांसोबत बसू परंतु त्यांचे चेहरेही ओळखू शकत नव्हतो कारण खूप काळ लोटला. ३५-३६ जण एकत्र आलो, रात्री जेवण केले, गप्पा मारल्या आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. परंतु मला आनंद मिळाला नाही कारण मी मित्र शोधत होतो आणि ते माझ्यात मुख्यमंत्री बघत होते. आताही ते माझ्या संपर्कात आहेत परंतु ते मोठ्या सन्मानाने माझ्याकडे पाहतात अशी आठवण मोदींनी मुलाखतीत सांगितली.