वायनाडला सर्वताेपरी मदत करण्याचा पंतप्रधान मोदींनी दिला शब्द, पीडितांना धीर दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 01:20 PM2024-08-11T13:20:50+5:302024-08-11T13:22:13+5:30
भूस्खलनग्रस्त भागाला भेट, वायनाडमधील मदत आणि बचावकार्याची घेतली माहित
वायनाड (केरळ): केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन उद्ध्वस्त झालेल्या लोकांच्या बचाव व पुनर्वसन कार्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करील, अशी ग्वाही पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी येथील भूस्खलनग्रस्त भागाला भेट देऊन बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला. नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, सर्व भारतीयांच्या प्रार्थना आणि सद्भावना भूस्खलन पीडितांसोबत आहेत. या आपत्तीने असंख्य कुटुंबांची स्वप्ने उद्ध्वस्त केली आहेत. या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना साह्य करण्यासाठी केंद्र सरकार केरळ सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
या भूस्खलन दुर्घटनेत आतापर्यंत २२६ लोक मरण पावले असून १३० लोक अजूनही बेपत्ता आहेत.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी, घटनास्थळी तळ ठोकून असलेले मंत्रिमंडळ उपसमितीतील मंत्री, सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी यांची बैठकीला उपस्थिती होती. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेेल्या रुग्णांची त्यांनी विचारपूस केली, नातेवाईकांना धीर दिला.
...अन् अश्रूंचा बांध फुटला
भूस्खलनग्रस्त नागरिकांसाठी उभारलेल्या मदत छावणीलाही मोदी यांनी भेट दिली. सर्वस्व गमावलेल्या २ मुलांसह काही आपदग्रस्तांशी संवाद साधून त्यांनी घटनेची माहिती घेतली तसेच पीडितांची दु:खे जाणून घेऊन त्यांना धीर दिला. मोदी यांनी पीडितांच्या डोक्यावरून व खांद्यावरून मायेचा हात फिरवला तेव्हा पीडितांचा अश्रूंचा बांध फुटल्याचे दिसून आले.
‘ते’ आता मणिपूरलाही जातील : काँग्रेस
दरम्यान, पंतप्रधानांच्या वायनाड दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडला भेट दिली, ही चांगली गोष्ट आहे. अपेक्षा आहे की, ते आता मणिपूरलाही भेट देतील.’
१९० फूट लांब ब्रिजची पाहणी
तत्पूर्वी सकाळी ११ वाजता मोदी यांचे एअर इंडिया वन विमानाने कन्नूरला आगमन झाले. तेथून ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे वायनाडला पोहोचले. वायनाडला जात असताना त्यांनी भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झालेल्या चुरालमाला, मुंदाक्काई आणि पुंचिरिमत्तम या गावांची हवाई पाहणी केली.
कालपेट्टा येथील हायस्कूलच्या मैदानात त्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. तेथून ते चुरालमाला येथे पोहोचले. तेथे लष्कराने मदतकार्यासाठी उभारलेल्या १९० फूट लांब बेली ब्रिजची त्यांनी पाहणी केली. चुरालमाला गावात जाऊन त्यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. ३० जुलै रोजी येथे भूस्खलन झाले होते.
ही दुर्घटना घडली तेव्हापासून मी इथल्या संपर्कात असून सातत्याने माहिती घेत आहे. भूस्खलन पीडितांना किती भीषण संकटाचा सामना करावा लागला, हे मी पीडितांच्या तोंडून ऐकले आहे. निसर्गाचे रौद्ररूप भूस्खलनाच्या निमित्ताने दिसून आले.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान