"फारुख अब्दुल्लांच्या सांगण्याने PM मोदींनी कलम ३७० हटवले"; खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:46 PM2024-10-16T16:46:58+5:302024-10-16T16:54:22+5:30

खासदार शेख अब्दुल रशीद यांनी फारुख आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

PM Modi removed Article 370 after consulting Farooq and Omar claims Engineer Rashid | "फारुख अब्दुल्लांच्या सांगण्याने PM मोदींनी कलम ३७० हटवले"; खासदाराचा गंभीर आरोप

"फारुख अब्दुल्लांच्या सांगण्याने PM मोदींनी कलम ३७० हटवले"; खासदाराचा गंभीर आरोप

Engineer Rashid Big Claim : जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री म्हणून जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर आज १६ ऑक्टोबर रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अवामी इत्तेहाद पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शेख अब्दुल रशीद यांनी मोठा आरोप केला. फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हातमिळवणी केल्याचा दावा इंजिनियर रशीद यांनी केला आहे. इंजिनियर रशीद यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या बाबतीत फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींशी हातमिळवणी केल्याचा आरोप रशीद यांनी बुधवारी केला. हे पाऊल उचलण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अब्दुल्ला कुटुंबाशी सल्लामसलत केल्याचाही दावा राशिद यांनी केला आहे. काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्सला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपने मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

एनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये इंजिनियर रशीद यांनी हे आरोप केले. "ओमर अब्दुल्ला राज्याचा दर्जा, कलम ३७० आणि ३५अ बद्दल बोलतात. तर ओमर अब्दुल्ला ३७० पासून लाबं पळून जात आहेत. जेव्हा पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवले तेव्हा त्यांनी फारुख अब्दुल्ला यांची तीन दिवसांआधी भेट घेतली होती. या बैठकीनंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले होते की, काहीही हटवले जाणार नाही. मात्र कलम ३७० काढून टाकण्यात आले आणि फारूख आणि ओमर अब्दुल्ला यांना गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी सल्लामसलत करून कलम ३७० हटवले. हे सर्व मॅच फिक्सिंग होते. भाजपने नॅशनल कॉन्फरन्सला सत्तेत येण्यास मदत केली यात शंका नाही," असेही इंजिनियर रशीद म्हणाले.

२००५ मध्ये, इंजिनियर रशीद यांना दहशतवाद्यांचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली श्रीनगरमधील स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आणि तीन महिने नजरकैदेत ठेवले होते. त्यांच्यावर देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप असून त्यांना कार्गो, हम्मामा आणि राजबाग तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर श्रीनगरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले. मात्र ऑगस्ट २०१९ मध्ये, रशीद यांना पुन्हा युएपीए अंतर्गत अटक करण्यात आली. ऑगस्ट २०१९ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले होते. तुरुंगात असताना २०२४ च्या संसदीय निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करून २०४,००० मतांच्या फरकाने विजय मिळवला.

Web Title: PM Modi removed Article 370 after consulting Farooq and Omar claims Engineer Rashid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.