काँग्रेसने शेतकऱ्यांबद्दल बाता मारल्या, केले काहीही नाही; पाणी तंटे विकोपाला नेले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:08 IST2024-12-18T11:04:58+5:302024-12-18T11:08:11+5:30
राजस्थानमध्ये भाजप सरकारच्या वर्षपूर्तिनिमित्त आयोजिलेत समारंभात मोदी यांनी हे वक्तव्य केले.

काँग्रेसने शेतकऱ्यांबद्दल बाता मारल्या, केले काहीही नाही; पाणी तंटे विकोपाला नेले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
जयपूर : काँग्रेस शेतकऱ्यांबद्दल मोठमोठ्या बाता मारते, पण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी या पक्षाने काहीही केलेले नाही आणि तसेच ते दुसऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ देत नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. ते म्हणाले की, काँग्रेसने राज्या-राज्यांमधील जलविवाद सोडविण्याऐवजी ते अधिक विकोपाला नेले.
राजस्थानमध्ये भाजप सरकारच्या वर्षपूर्तिनिमित्त आयोजिलेत समारंभात मोदी यांनी हे वक्तव्य केले. त्या राज्यातील ऊर्जा, रस्ते, रेल्वे, जलसंपदा क्षेत्रातील २४ विकासप्रकल्पांपैकी काहींचा पायाभरणी, तर काही प्रकल्पांचा उद्घाटन समारंभ मोदी यांच्या हस्ते पार पडला. ४६,३०० कोटी रुपये खर्चाचे हे सारे प्रकल्प आहेत.
मोदी यावेळी म्हणाले की, काँग्रेसने राज्या-राज्यांमधील जलविवाद सोडविण्याऐवजी अधिक जटिल बनवले. मात्र, भाजपने राज्यांमध्ये सुसंवाद वाढावा. आमचा संघर्षापेक्षा सहकार्यावर विश्वास आहे. भाजपने विरोधासाठी विरोध कधीच केला नाही. आम्हाला अनेक प्रश्नांवर तोडगे काढायचे आहेत. प्रश्न न सोडविता त्यांचे भिजत घोंगडे ठेवण्यात भाजपला स्वारस्य नाही. त्यामुळे आम्ही इआरसीपी प्रकल्पाला मंजुरी दिलीच, शिवाय त्या प्रकल्पाचा विस्तारही केला, असे माेदी म्हणाले.
‘नर्मदा प्रकल्पातही काँग्रेसचा खो घालायचा प्रयत्न’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नर्मदेचे पाणी गुजरातमधील विविध भागांत पोहोचावे यासाठी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मी एक मोहीम राबविली होती. त्यावेळी त्या मोहिमेत खो घालण्याचे प्रयत्न काँग्रेस व काही स्वयंसेवी संस्थांनी केले, असाही आरोप पंतप्रधानांनी केला.