PM Narendra Modi Interview: “छोट्या शेतकऱ्यांच्या वेदना कळतात, राष्ट्रहितासाठी कृषी कायदे रद्द केले”: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 09:47 PM2022-02-09T21:47:32+5:302022-02-09T21:50:45+5:30
PM Narendra Modi Interview: देशातील शेतकरी भाजपचा जयजयकार करतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात (Farmers Protest) सुमारे वर्षभर देशातील लाखो शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला. अनेक चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या. अखेर केंद्रातील मोदी सरकारने नमते घेऊन कृषी कायदे रद्द (Farm Laws Repealed) केले. या पार्श्वभूमीवर बोलताना देशातील छोट्या शेतकऱ्यांच्याही वेदना समजू शकतो. राष्ट्रहितासाठी केंद्राने केलेले कृषी कायदे रद्द केले, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते. शेतकऱ्यांनी दिलेल्या मोठ्या लढ्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने अखेर वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे रद्द केले. तसा ठरावही संसदेत मंजूर केला. मात्र, मोदी सरकारने निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने कृषी कायदे रद्द केले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा राजकीय निर्णय होता, अशी टीकाही विरोधकांनी केली होती. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
राष्ट्रहितासाठी कृषी कायदे रद्द घेतले
शेतकऱ्यांची मने जिंकण्यासाठी आलो आहे आणि तसेच करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. छोट्या शेतकऱ्यांच्या वेदना मला कळतात. मी म्हणालो होतो की, शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीविषयक कायदे लागू केले गेले, पण राष्ट्रहितासाठी ते मागे घेण्यात आले, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले. यापुढे पुन्हा एकदा शेतकरी बांधावांशी या कायद्यासंदर्भात चर्चा करून मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार का, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांना विचारण्यात आला. यावर, शेतकरी बांधवांशी नेहमी आमचा संवाद सुरू असतो. अगदी अर्थसंकल्प तयार करतानाही आम्ही त्यांचे विचार घेतो. आपल्या देशातील छोट्यातील छोटा व्यक्तीही आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. त्यांचे अनेक अनुभव आम्हाला उपयोगी पडतात. प्रशासनातील बाबू मंडळी आणि नेत्यांनाच सगळ्यातील सगळे कळते, असे नाही, असे मोदी म्हणाले.
देशातील शेतकरी भाजपचा जयजयकार करतो
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घोषित करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी फारशी झालेली दिसली नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना आणल्या. इतकेच नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट योजनेचे पैसे पोहोचतात. यापूर्वी असे घडत नव्हते, असे शेतकरीच सांगतात आणि भाजपचा जयजयकार करतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.