जगातील अस्थिर वातावरणात आज भारतानं शक्तीशाली होणं गरजेचं; युक्रेन वादावर PM मोदी बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 05:58 PM2022-02-22T17:58:34+5:302022-02-22T17:59:59+5:30
UP Election 2022: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये निवडणूक रॅलीमध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेन वादावरही भाष्य केलं आहे.
UP Election 2022: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये निवडणूक रॅलीमध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेन वादावरही भाष्य केलं आहे. सध्या जगभरात किती अस्थिरतेचं वातावरण आहे अशावेळी भारतानं अधिक शक्तीशाली असणं खूप गरजेचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. भारतानं अधिक शक्तीशाली होणं हे देशासोबतच संपूर्ण मानव सृष्टीसाठी खूप गरजेचं असल्याचं ते म्हणाले. आज तुमचं प्रत्येक मत देशाला अधिक ताकदवान बनवेल, असंही ते म्हणाले.
"वर्गात जर चांगला शिक्षक नसेल तर विद्यार्थ्यांना तो आवडतो का? त्यामुळेच विद्यार्थ्यांचं शिक्षण जर चांगलं व्हायचं असेल तर आधी शिक्षक प्रबळ असावा लागतो. त्यामुळे अशाच पद्धतीनं देश आणि राज्याची जबाबदारी जर मजबूत खांद्यांवर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सुहेलदेवच्या धरतीवरील प्रत्येकाचं मत आज देशाला मजबूत करेल. आजवर अनेक संघर्षांचा सामना करुन देशानं स्वातंत्र्य प्राप्त केलं आणि इथवरचा प्रवास केला आहे. भारत एक विकसीत आणि समृद्ध देश व्हावा हेच प्रत्येकाचं स्वप्न आहे. समृद्ध भारतासाठी उत्तर प्रदेश राज्यानं समृद्ध आणि विकसीत होणं खूप गरजेचं आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सरकारच्या आधीच्या सरकारांवरही मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. "मी २०१४ सालापासून २०१७ पर्यंत कट्टर घराणेशाहीवाद्याचं कामकाज, कार्य आणि कारनामे खूप जवळून पाहिले आहेत. आपल्या स्वार्थासाठी घराणेशाहीचं द्योतक असलेली सरकारनं जनतेच्या हिताला मूठमाती देतात हे पाहून खूप दु:ख होतं. २०१७ आधी बस्ती, गोंडा, बहराइच आणि बलरामपूर येथील जनतेनं खूप भेदभाव सहन केला आहे. पण योगी सरकारनं गेल्या पाच वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे येथील जनतेला सुख आणि सेवा तसंच गरीबांना सन्मान मिळाला आहे", असं मोदी म्हणाले.