विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:24 PM2024-05-30T22:24:48+5:302024-05-30T22:26:14+5:30
नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान करण्यास सुरुवात केली असून ते पुढील ४५ तास या अवस्थेत राहणार असल्याचे समजते.
PM Narendra Modi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळच्या सुमारास तामिळनाडू इथं पोहोचले. सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान करण्यास सुरुवात केली असून ते पुढील ४५ तास या अवस्थेत राहणार असल्याचे समजते. या काळात ते मौन राहणार असून त्यांचा आहारही फक्त नारळाचं पानी, द्राक्षांचा रस किंवा तत्सम पदार्थांचा असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सायंकाळपासून १ जूनच्या सायंकाळपर्यंत तेथे ध्यान करतील. हे दोन दिवस पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाही. गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींनाही तेथे जाण्याची परवानगी नसेल. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तेथे पोहोचतील. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँडिंगची चाचणीही घेण्यात आली आहे.
दरम्यान, आज सायंकाळी तामिळनाडू इथं दाखल झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम भगवती अम्मन मंदिर इथं पूजा केली. त्यानंतर ते विवेकानंद रॉक मेमोरियल इथं पोहोचले. ध्यान केल्यानंतर १ जून रोजी ते तामिळनाडूतून निघण्याआधी येथील संत तिरुवल्लुवर यांच्या ठिकाणाचाही दौरा करण्याची शक्यता आहे.
विवेकानंद रॉकच का?
असे मानले जाते की स्वामी विवेकानंदांना येथेच दिव्य ज्ञान प्राप्त झाली होते, यामुळे हे ठिकाण पंतप्रधान मोदींच्या ध्यानासाठी निवडण्यात आले आहे. एका भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींनी ध्यानासाठी निवडलेल्या या खडकाचा विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आणि एखाद्या भिक्षुच्या जीवनात गौतम बुद्धांच्या सारनाथ प्रमाणेच या ठिकाणाचेही महत्व आहे. विवेकानंद संपूर्ण देशाचे भ्रमण करून येथे पोहोचले, तीन दिवस ध्यानधारणा केली आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते.