राहुल गांधींनी कागद न घेता 15 मिनिटं बोलून दाखवावं, मोदींचं राहुलना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 03:43 PM2018-05-01T15:43:41+5:302018-05-01T16:25:57+5:30
मोदींचा राहुल गांधी आणि काँग्रेस सरकारवर हल्लाबोल
म्हैसूर: कर्नाटकमध्ये भाजपची लाट नाही, तर वादळ आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. कर्नाटक काँग्रेस सरकार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना यावेळी मोदींनी लक्ष्य केलं. राहुल गांधी कर्नाटक सरकारच्या कामगिरीबद्दल 15 मिनिटं बोलले, तरी खूप झालं, असं म्हणत मोदींनी त्यांना काँग्रेस सरकारच्या कामाबद्दल 15 मिनिटं बोलण्याचं आव्हान दिलं. 'तुम्ही नामदार आहात. आम्ही कामदार आहोत,' असा टोलादेखील मोदींनी राहुल यांना लगावला. ते म्हैसूरमध्ये बोलत होते.
राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच मोदींना थेट आव्हान दिलं होतं. मोदी त्यांच्या सरकारच्या कामगिरीबद्दल लोकसभेत 15 मिनिटंदेखील बोलू शकणार नाहीत, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. राहुल यांच्या या आव्हानाला मोदींनी प्रतिआव्हान दिलंय. राहुल गांधीनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या कामगिरीबद्दल 15 मिनिटं बोलून दाखवावं असं आव्हान मोदींनी दिलं. 'तुमच्या सरकारनं केलेल्या कामांबद्दल बोलून दाखवा. कोणताही कागद न पाहता राहुल यांनी हिंदी, इंग्रजी किंवा त्यांच्या मातृभाषेत बोलावं,' असं मोदी म्हणाले.
भाजप सरकारच्या काळात देशाच्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. '2005 मध्ये मनमोहन सिंग यांनी 2009 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचेल, असं म्हटलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं? काँग्रेसनं डॉ. मनमोहन सिंग यांना कशी वागणूक दिली, हे आपण पाहिलंय. मनमोहन सिंग यांनी आणलेला अध्यादेश राहुल गांधींनी फाडला होता,' याची आठवणही मोदींनी यावेळी करून दिली. जिथे लोकायुक्तच सुरक्षित नसतील, तिथे सामान्य लोक किती सुरक्षित असतील?, असा सवाल उपस्थित करत मोदींनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरही भाष्य केलं.