PM Modi On Diwali : "सर्जिकल स्ट्राईकमधील तुमच्या भूमिकेवर देशाला अभिमान," पंतप्रधानांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 01:37 PM2021-11-04T13:37:28+5:302021-11-04T13:37:51+5:30
Pm Narendra Modi on Diwali : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत गुरूवारीत जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे तैनात असलेल्या जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली तसंच आपले सैनिक हे भारत मातेचे सुरक्षा कवच असल्याचं म्हटलं. सर्जिकल स्ट्राईकमध्ये येथील ब्रिगेडनं जी भूमिका बजावली आहे ती प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.
"आपले जवान हे भारतमातेचे सुरक्षा कवच आहेत. तुमच्या सर्वांमुळेच आम्ही देशवासीय शांततेत झोप घेऊ शकतो आणि सणासुदीच्या कालावधीत आनंदातही राहतो. मी प्रत्येक दिवाळी ही सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसोबत साजरी केली. मी आज या ठिकाणी आपल्या सैनिकांसाठी कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे," असंही मोदी म्हणाले.
#WATCH Prime Minister Narendra Modi along with Indian Army Jawans chorused 'Bharat Mata Ki Ji' slogan at Nowshera, J&K pic.twitter.com/RcJ7ksai0f
— ANI (@ANI) November 4, 2021
देशवासीयांचे आशीर्वाद घेऊन आलोय
"मी आज पुन्हा तुमच्यामध्ये आलो आहे. आज पुन्हा तुमच्याकडून नवी ऊर्जा, आशा आणि विश्वास घेऊन जाणार आहे. मी या ठिकाणी एकटा आलेलो नाही, मी १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. दीपावलीचा दिवा तुमची वीरता, पराक्रम, शौर्य आणि त्यागाच्या नावावर प्रत्येक भारतीय त्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तुम्हाला कायम अनेक शुभेच्छा देत राहिल," असंही ते म्हणाले.
तंत्रज्ञानासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होतो
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या सरकारवर निशाणा साधला. "यापूर्वी संरक्षणाशी निगडीत साधनसामग्री बाबत हे मानण्यात आलं होतं की आपल्याला जे काही मिळेल ते परदेशातूनच मिळेल. आपल्याला तंत्रज्ञानासाठी दुसऱ्यांपुढे झुकावं लागत होतं, अधिक पैसे द्यावे लागत होते. म्हणजेच एक अधिकारी जो फाईल सुरू करायचा तो रिटायर व्हायचा, पण काम पूर्ण होत नव्तं. अशातच शस्त्रास्त्र घाईघाईनं खरेदी केली जात होती. इतकंच नाही, तर स्पेअर पार्ट्ससाठीही आपल्याला अन्य देशांवर अवलंबून राहावं लागत होतं," असं मोदी म्हणाले.
संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम होणार
सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतवरही भाष्य केलं. "देशाच्या संरक्षण खर्चासाठी जितका अर्थसंकल्प होता, त्यातील ६५ टक्के देशातच खरेदीवर खर्च होत आहे. २०० पेक्षा अधिक वस्तू आणि उपकरणं देशांतर्गतच खरेदी केली जाणार असल्याचं सरकारनं ठरवलं आहे. पुढील काही महिन्यात यात अधिक सामानाची वाढ होईल. यामुळे संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम होईल. नव्या शस्त्रास्त्रांसाठी आणि उपकरणांसाठी देशातील गुंतवणूक वाढेल. देशात आज अर्जून टँक आणि तेजससारखी कमी वजनाची एअरक्राफ्ट्स तयार होत आहेत. आपल्या ज्या ऑर्डिनन्स फॅक्ट्ररीज होत्या, त्या आता स्पेशल इक्विपमेंट्स तयार करणार आहेत. विजयादशमीच्या दिवशी ७ डिफेन्स कंपन्या राष्ट्रसेवेसाठी समर्पित करण्यात आल्या," असंही त्यांनी नमूद केलं.