'छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली...' राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:06 PM2023-06-02T12:06:03+5:302023-06-02T12:06:36+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामीची मानसिकता संपवली. शिवाजी महाराजांनी भारताची एकता आणि अखंडता नेहमीच सर्वोच्च ठेवली. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत पाहायला मिळते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. राष्ट्रीय कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या कारभाराचे मूलभूत घटक होते. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे.
'महाराजांनी भारताची एकता आणि अखंडता नेहमीच सर्वोच्च ठेवली, आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब 'एक भारत-उत्तम भारत' या संकल्पनेत पाहायला मिळते. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने देशवासीयांचा आत्मविश्वास हिरावून घेतला होता, अशा काळात लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे कठीण काम होते. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते, त्यांनी स्वराज्यही स्थापन केले आणि सुराज्यही स्थापन केले. ते त्यांच्या शौर्यासाठी आणि सुशासनासाठी देखील ओळखले जातात. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टीकोनही मांडला. राज्यकारभाराचे लोककल्याणकारी चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवले. त्यावेळी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे हे अवघड काम होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केवळ आक्रमकांशीच लढा दिला नाही तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Chhatrapati Shivaji Maharaj is a beacon of courage and bravery. His ideals are a source of great inspiration. https://t.co/eQZgsyTMm4
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023