पंतप्रधान नरेंद्र मोदी जसलमेरमध्ये; जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 11:26 AM2020-11-14T11:26:19+5:302020-11-14T11:26:42+5:30
पंतप्रधान मोदी राजस्थानमध्ये पोहोचले
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी ते राजस्थानच्या जसलमेरमध्ये पोहोचले आहेत. मोदी लोंगेवालात जवानांसोबत दिवाळी साजरी करतील. यावेळी सीडीएस बिपिन रावत, लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थानादेखील मोदींसोबत असतील. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात लोंगेवालात तुंबळ युद्ध झालं होतं. अवघ्या १२० भारतीय जवानांनी अतुलनीय साहस दाखवत पाकिस्तानी लष्कराच्या रणगाड्यांच्या अनेक तुकड्या नेस्तनाबूत केल्या होत्या.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून ते दिवाळी जवानांसोबत साजरी करतात. त्यांनी आतापर्यंत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. कालच भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यात पाकिस्तानचे ११ सैनिक मृत्यूमुखी पडले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्चिंग पॅड्सदेखील उद्ध्वस्त झाले.
लोंगेवालातील लढाई; भारताचे १२० जवान पाकिस्तानच्या रणगाड्यांवर भारी
भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये झालेल्या लढाईत जसलमेरच्या वाळवंटात भारतीय जवानांनी दाखवलेलं शौर्य निर्णायक ठरलं. भारतीय जवानांनी दिलेल्या झुंजीमुळे पाकिस्तानचे मनसुबे उधळले गेले. जसलमेरवर कब्जा करण्याच्या हेतूनं पाकिस्तानी लष्कर रणगाड्यांच्या ३ तुकड्या घेऊन घुसलं होतं. त्यावेळी मेजर कुलदीप सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली १२० जवानांनी अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाचं दर्शन घडवलं. पाकिस्तानी सैन्याला रोखून धरा किंवा माघार घ्या, अशा सूचना त्यांना वरिष्ठांकडून मेजर कुलदीप यांना देण्यात आल्या होत्या.
मातृभूमीच्या रक्षणासाठी लढू, गरज पडल्यास धारातीर्थी पडू, पण इंचनइंच लढवू, असा पवित्रा मेजर कुलदीप सिंग यांनी घेतला. पाकिस्तानच्या रणगाड्यांना रोखण्यासाठी वाळवंटात रणगाडे विरोधी सुरुंग पेरण्यात आले. भारतीय जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत पाकिस्तानचे सगळे डावपेच हाणून पाडले. भारतीय सैन्यानं जसलमेरच्या वाळवंटात पराक्रम गाजवला आणि इतिहास रचला. भारतीय सैन्याच्या याच शौर्यावर 'बॉर्डर' चित्रपट आला होता. त्यात मेजर कुलदीप सिंग यांची भूमिका सनी देओल यांनी साकारली होती.