मोदींनी सांगितलं इंटरनेटवर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोंमागचं सत्य
By मोरेश्वर येरम | Published: November 29, 2020 12:59 PM2020-11-29T12:59:09+5:302020-11-29T13:08:19+5:30
"गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर चेरी ब्लॉसमचे फोटो व्हायरल झाले आहेत. चेरी ब्लॉसम म्हटलं की तुम्ही विचार करत असाल मी जपानबद्दल बोलतोय. पण तसं नाहीय. इंटरनेटवर व्हायरल झालेले ते फोटो जपानचे नाहीत.'', असा खुलासा मोदींनी केला.
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवर 'मन की बात' या कार्यक्रमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. मोदींनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केलं. सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या 'चेरी ब्लॉसम' फोटोंचीही दखल मोदींनी घेतली. गुलाबी रंगाच्या मनमोहक फुलांची जणू चादर शहराने ओढली असावी असे हे सुंदर फोटो नक्की कुठले आहेत? अशी चर्चा सोशल मीडियात सुरू होती. काहींनी जपानमधील ते फोटो असल्याचं म्हटलं. पण या फोटोंमागचं सत्य मोदींनी आज देशवासियांना सांगितलं.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेले ते फोटो जपानचे नाहीत
"गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर चेरी ब्लॉसमचे फोटो व्हायरल झाले आहेत. चेरी ब्लॉसम म्हटलं की तुम्ही विचार करत असाल मी जपानबद्दल बोलतोय. पण तसं नाहीय. इंटरनेटवर व्हायरल झालेले ते फोटो जपानचे नाहीत.'', असा खुलासा मोदींनी केला.
मेघालयचं सौंदर्य वाढवणारे चेरी ब्लॉसमचे फोटो
मोदी पुढे म्हणाले की, ''इंटरनेटवर चर्चा होत असलेले ते फोटो मेघालयच्या शिलॉंग येथील आहेत. मेघालयच्या सौंदर्यात चेरी ब्लॉसमने भर टाकली आहे''
मेघालयमध्ये दरवर्षी होतो चेरी ब्लॉसम फेस्टीव्हल
गुलाबी फुलांची चादर ओढलेले हे चेरी ब्लॉसमचे वृक्ष थंडीचं स्वागत करण्यासाठी सज्ज असतात. मनमोहक गुलाबी रंगाच्या फुलांचे सौंदर्य डोळ्यांना सुखावणारे असते. मेघालयच्या शिलॉंग येथे दरवर्षी चेरी ब्लॉसम फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते. थंडीच्या दिवसात शिलॉंगमध्ये चेरी ब्लॉसमच्या झाडांना बहर येतो आणि सर्वत्र गुलाबी रंगाची उधळण झालेली पाहायला मिळते.
कोरोनामुळे होऊ शकला नाही चेरी ब्लॉसम फेस्टीव्हल
कोरोनाच्या महामारीमुळे यंदा चेरी ब्लॉसम फेस्टीव्हलचं आयोजन होऊ शकलं नाही. दरवर्षी या फेस्टीव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक शिलॉंगमध्ये येत असतात. पण यावेळी कोरोनामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध आले. फेस्टीव्हल होऊ शकला नसला तरी या ठिकाणच्या सुंदर फोटोंनी सध्या सोशल मीडिया व्यापून टाकलं आहे. सर्वत्र या फोटोंची चर्चा होत आहे.