औरंगाबादच्या मराठमोळ्या शिल्पकाराने साकारली दिल्लीतील भव्य राजमुद्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:56 AM2022-07-12T05:56:57+5:302022-07-12T05:57:33+5:30
दिल्लीत उभ्या राहणाऱ्या सेंट्रल व्हिस्टामध्ये २६ फूट उंचीच्या भव्य अशाेकस्तंभ राजमुद्रेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पार पडले.
शांतीलाल गायकवाड
दिल्लीत उभ्या राहणाऱ्या सेंट्रल व्हिस्टामध्ये २६ फूट उंचीच्या भव्य अशाेकस्तंभ राजमुद्रेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. ही राजमुद्रा औरंगाबादचे सुपुत्र शिल्पकार सुनील देवरे व सुशील देवरे बंधूंनी साकारली असून, ती जयपूरमार्गे दिल्लीत स्थापित करण्यात आली.
मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर सुनील देवरे यांनी अनेक शिल्पे साकारली आहेत. एमजीएमच्या यशवंत ग्राफिक्समधील डिझायनर सुशील देवरे यांनी या राजमुद्रेच्या निर्मितीची कहाणी लोकमत प्रतिनिधीसमोर कथन केली.
अशी आहे याची कहाणी...
- वर्षभरापूर्वी ऑगस्टमध्ये क्ले मॉडेल तयार करण्याचे काम सुरू झाले व आठ महिन्यांत ते पूर्णही झाले. या राजमुद्रेचे शिल्प तयार करण्याचे काम टाटा ग्रुपमार्फत आमच्या सुनील देवरे स्टुडियोला मिळाले. यासाठी देशभरातून मॅकेट्स (छोटे मॉडेल्स) मागविण्यात आले होते. त्यातील आमचे मॅकेट्स निवडले गेले.
- संसदेच्या पथकाने सावंगीतील स्टुडियोला भेट देऊन क्ले मॉडेलची पाहणी केली. अपेक्षित बदल सुचवून या मॉडेलला मंजुरी मिळाली. त्यानंतर हे भव्य शिल्प तयार करून त्याचे फायबर शिल्प तयार करण्यात आले. एवढ्या भव्य शिल्पापासून एकसंघ धातूचे शिल्प तयार करण्यासाठी औरंगाबादेत मोठ्या भट्ट्या नाहीत. त्यामुळे फायबर शिल्पाचे लहान भाग करून ते जयपूरच्या शिल्पिक स्टुडिओत नेण्यात आले. तेथे ब्राँझ धातूचे एकसंघ शिल्प साकारले.
या शिल्पाची वैशिष्ट्ये
उंची : २६ फूट व्यास : ११ फूट
वजन : ९ टन धातू : ब्राँझ
स्ट्रक्चरल डिझाइन : धनश्री काळे, वास्तुविशारद, औरंगाबाद
औरंगाबादेत व औरंगाबादच्या सुपुत्राने तयार केलेली राजमुद्रेची भव्य प्रतिकृती दिल्लीतील संसद भवनासमोर दिमाखाने उभी राहिली आहे. हा क्षण औरंगाबादसाठी गौरवाचा व अभिमानाचा आहे.
सुशील देवरे, ग्राफिक डिझायनर