पंतप्रधान मोदी आज पाहणार मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड; 'या' मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 07:53 AM2019-12-21T07:53:00+5:302019-12-21T07:53:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. त्या कामांच्याच आधारे मंत्र्यांना रँकिंग बहाल केलं जाणार असून, त्याच्या आधारवरच मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार आहेत. तसेच कामचुकार मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली असून, त्यात सर्व मंत्र्यांना आपले रिपोर्ट कार्ड्स सादर करण्यास सांगितले आहे. या बैठकीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी मंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करणार आहेत.
मोदी सरकार 2 ने अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर त्यातून उद्भवलेली परिस्थिती निवळण्यात सरकारचा वेळ गेला. तिहेरी तलाक, कलम 370 आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा यांसारखे निर्णय मोदी सरकारने घेतले होते. त्यामुळे अनेक भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या महत्त्वाच्या निर्णयादरम्यान मंत्र्यांच्या कामगिरीची आढावा घेणं मोदींना शक्य झालेलं नव्हतं. मंत्र्यांचं मूल्यमापन केल्यानंतर चांगलं काम करणाऱ्या मंत्र्यांना बढती दिली जाऊ शकते आणि ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यांना पदावरून हटवलंही जाण्याची शक्यता आहे. मंत्री आपले रिपोर्ट कार्ड मोदींसमोरच मांडणार असल्याची शक्यता असल्यानं मंत्र्यांच्या समोरच सर्वकाही स्पष्ट होणार आहे. जास्त करून महत्त्वाची मंत्रिपदं सांभाळणाऱ्या मंत्र्यांवर मोदींचं लक्ष राहणार आहे.
नवी चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्याचाही मोदींचा विचार असून, मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी या बैठकीतून अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्या मंत्र्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्यांना बढती मिळणार आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी सुमार दर्जाची आणि असमाधानकारक आहे, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी काय भूमिका घेणार हे आजच्या बैठकीनंतरच समजणार असून, केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.