पंतप्रधान मोदींचा १० वर्षांचा कार्यकाळ ईशान्य भारतासाठी ‘सुवर्णकाळ’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:10 AM2024-01-20T06:10:08+5:302024-01-20T08:21:25+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे.
शिलाँग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा १० वर्षांचा कार्यकाळ हा ईशान्य भारतातील राज्यांसाठी सुवर्णकाळ आहे. या कालावधीत या राज्यांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी व संघर्ष मिटविण्यासाठी योग्य तोडगा काढण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
नॉर्थ इस्टर्न कौन्सिलच्या (एनइसी) ७१व्या अधिवेशनात ते म्हणाले की, वारंवार होणारे रास्ता रोको, बंद, धुमसत असणारा असंतोष हे राज्यांतील चित्र आता इतिहासजमा झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे केवळ ईशान्य भारत व दिल्ली तसेच देशातील अन्य भागांतले अंतर केवळ कमी झाले नाही तर लोकांमधील मतभेदही कमी झाले.
ईशान्य भारतात हिंसाचाराच्या घटना घटल्या
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत ११,१२१ हिंसक घटना ईशान्य भारतात घडल्या. २०१४ ते २०२३मध्ये या घटनांची संख्या ३,११४ होती. म्हणजे हिंसक घटनांत ७३ टक्क्यांनी घट झाली. या राज्यांत विविध घटनांत लष्करी जवान शहीद होण्याचे प्रमाणही ७१ टक्क्यांनी तर हिंसाचारात नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांनी घटले.
घुसखोरीचे प्रमाणही झाले कमी
अमित शाह म्हणाले की, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये घुसखोरी होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षांत दहशतवादी संघटनांचे ८,९०० सदस्य शरण आले असून मुख्य प्रवाहात सामील झाले. शांतता व समृद्धी एकत्र नांदते हा संदेश त्यातून सर्व देशाला मिळाला आहे.