...अन् पंतप्रधान मोदींच्या भावानं पोलीस ठाण्याबाहेरच धरणं धरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 02:47 PM2019-05-15T14:47:32+5:302019-05-15T14:48:47+5:30
प्रल्हाद दामोदरदास मोदींचं पोलीस ठाण्याबाहेर धरणं
जयपूर: पोलिसांनी पुरेशी सुरक्षा न दिल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद दामोदरदास मोदी यांनी पोलीस ठाण्याबाहेरचं धरणं धरलं. काल (मंगळवारी) रात्री ही घटना घडली. प्रल्हाद मोदी उदयपूरहून जयपूरला दाखल झाले. पोलिसांनी आपल्याला एस्कॉर्ट वाहन न दिल्याचं मोदी म्हणाले. पोलीस सुरक्षेसाठी स्वतंत्र वाहन देत नसल्यानं त्यांनी बागरु पोलीस ठाण्याबाहेर धरणं धरलं.
'मी कुठेही जातो, तेव्हा मला राज्य सरकारकडून एस्कॉर्ट वाहन दिलं जातं. पण जयपूरच्या पोलीस आयुक्तांना माझ्यापासून किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काहीतरी अडचण असावी. त्यामुळेच त्यांनी मला स्वतंत्र एस्कॉर्ट वाहन देण्यास नकार दिला,' असं प्रल्हाद मोदी म्हणाले. पोलीस आयुक्तांनी माझ्या सुरक्षेसाठी केवळ दोन पोलीस दिले आणि त्यांना माझ्यासोबत माझ्याच गाडीतून प्रवास करण्यास सांगितलं, असा दावादेखील त्यांनी केला. माझ्यासोबत माझं कुटुंब प्रवास करत असल्यानं गाडीत जागाच नाही, असं मोदींनी माध्यमांना सांगितलं.
माझ्यासोबत दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स (पीएसओ) देण्यात यावे, इतकीच मागणी आयुक्तांकडे केली होती, असं प्रल्हाद मोदींनी म्हटलं. यावर जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी स्पष्टीकरण दिलं. 'दोन पीएसओ बागरु पोलीस ठाण्यात मोदींची वाट पाहत होते. नियमानुसार त्यांनी मोदींच्या गाडीतूनच प्रवास करायला हवा. आम्ही याबद्दलचे आदेशदेखील मोदींना दाखवले. ज्या व्यक्तीला सुरक्षा पुरवली जाते, त्याच व्यक्तीच्या वाहनातून पीएसओंनी प्रवास करायचा असतो. मात्र प्रल्हाद मोदींनी पीएसओंना त्यांच्या गाडीत घेण्यास नकार दिला. पीएसओंना स्वतंत्र वाहन देण्यात यावं अशी त्यांची मागणी होती,' असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.