मोदींच्या 'मन की बात'वर डिसलाईक्सचा पाऊस; लाईक्सच्या तुलनेत डिसलाईक्सची संख्या नऊपट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 09:09 AM2020-08-31T09:09:22+5:302020-08-31T09:21:12+5:30
मोदींच्या मन की बातला जवळपास पावणे दोन लाख डिसलाईक्स; कमेंट सेक्शनमध्येही नाराजी व्यक्त
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. लोकलसाठी व्होकल व्हा, याचा पुनरुच्चार मोदींनी केला. खेळण्यांच्या निर्मितीत देशाला अग्रेसर होण्याची संधी आहे. त्यामुळे यासाठी स्टार्टअप्स कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही मोदींनी केलं. मात्र मोदींची 'मन की बात' अनेकांना पटलेली दिसत नाही. भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे.
पंतप्रधान मोदींनी काल 'मन की बात'मधून त्यांचे विचार मांडले. भाजपनं त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनवरून 'मन की बात'चा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून २१ तास झाले आहेत. सध्याच्या घडीला (३१ ऑगस्ट सकाळी ९ वाजेपर्यंत) ९ लाख ९८ हजार ७३३ जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आतापर्यंत ३० हजार लोकांनी व्हिडीओ लाईक केला. तर डिसलाईक करणाऱ्यांची संख्या २ लाख ७३ हजार इतकी आहे. म्हणजेच डिसलाईक करणाऱ्यांचं प्रमाण नऊपट आहे.
मोदींच्या 'मन की बात'वर अक्षरश: डिसलाईक्सचा पाऊस पडला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी मोदींच्या 'मन की बात'बद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर ५२ हजार २४२ कमेंट्स आल्या आहेत. यातल्या बहुतांश कमेंट्स नकारात्मक आहेत. आमच्या आयुष्याशी खेळत आहात, ते कमी आहे का की आता यांना आणखी खेळणी हवी आहेत?, मोदींना निवडून दिलं हीच आमची चूक आहे. ती २०२४ मध्ये दुरुस्त करू, २०१९ मध्ये तुम्हाला मतदान केलं, याचं दु:ख वाटतं, शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय आणि हे मन की बात करताहेत, रोम जळत असताना निरो गिटार वाजवत होता आणि भारतीय मरत असताना मोदी मन की बात करताहेत, अशा कमेंट्स मन की बातच्या खाली आल्या आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
जगातील खेळणीनिर्मिती उद्योगातून ७ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, त्यामध्ये भारताचा वाटा अगदीच नगण्य आहे. त्यामुळे देशातील स्टार्टअप कंपन्यांनी खेळण्यांच्या निर्मितीत उतरलं पाहिजे. स्थानिक स्तरावरील खेळण्यांच्या निर्मिती व प्रसारावरही अधिक लक्ष दिलं पाहिजे. देशातील तरुण व्यावसायिकांनी कॉम्प्युटर गेम विकसित केले पाहिजेत. ही आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.
देशातील तरुणांनी मायक्रोब्लॉगिंगसाठी असलेले कू, चिंगारी हे मोबाईल अॅप लोकप्रिय होत आहेत. कुटुकीकिड्स लर्निंग अॅप हेदेखील लहान मुलांना गणित, विज्ञान शिकविण्यासाठी खूप उपयोगी पडणारे आहे. भारतात बनविलेली ही अॅप लोकप्रिय होणे हे आत्मनिर्भर भारतासाठी चांगले चिन्ह आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
परीक्षा पे चर्चा हवी होती -राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मध्ये नीट, जेईई परीक्षेच्या मुद्यावर बोलतील, अशी विद्यार्थ्यांना आशा होती; परंतु पंतप्रधान खेळण्यांवर बोलले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. ‘मन की नहीं स्टुडन्ट की बात’ अशा हॅशटॅगचा वापर करून राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान ‘परीक्षा पे’ चर्चा करतील, अशी जेईई, नीट परीक्षार्थींना आशा होती; परंतु पंतप्रधानांनी ‘खिलौने पे’ चर्चा केली.