Video: कारला लिंबू मिरची लावणाऱ्यांना मोदी काय म्हणाले होते?; पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:05 AM2019-10-10T10:05:12+5:302019-10-10T10:15:15+5:30
राजनाथ सिंह ट्रोल झाल्यानंतर मोदींचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या राफेल विमानाची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये पूजा केली. राजनाथ यांनी विमानावर ओम काढला आणि त्याच्या चाकाखाली लिंबूदेखील ठेवला. यावरुन अनेक नेटकऱ्यांनी राजनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. तर काहींनी त्यात काय चुकलं, यावरुन इतका गहजब करण्याचं कारण काय, असे प्रश्नदेखील उपस्थित केले.
राफेलच्या चाकाखाली ठेवलेल्या लिंबांमुळे राजनाथ सोशल मीडियावर ट्रोल झाले. परदेशात जाऊन राजनाथ यांनी केलेल्या कृतीमुळे भारताबद्दल नेमका काय संदेश जगभरात गेला, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. लिंबू ठेवण्यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे, असा सवाल सोशल मीडियानं विचारला. मात्र असं याआधाही घडलंय. दसऱ्याच्या निमित्तानं शस्त्राची पूजा करण्याची आपली संस्कृती आहे, असा प्रतिवाद काही जणांकडून करण्यात आला.
राफेलच्या चाकाखाली ठेवण्यात आलेल्या लिंबांची चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मोदींनी अंधश्रद्धेवर भाष्य करताना दिसत आहे. ३० सेकंदांच्या या व्हिडीओत त्यांनी कारला लिंबू मिरची लावणाऱ्यांना टोला लगावला आहे. 'त्यांनी कारवर लिंबू आणि मिरची लावली... आणि न जाणे आणखी काय काय.. हे लोक देशाचं काय करणार आहेत?,' असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आहे.
Video: तेव्हा मोदी म्हणाले होते, लाकडात जीव असतो; आम्ही लाकडं कापू शकत नाही
याआधी आरेत झालेल्या वृक्षतोडीनंतरही मोदींचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये मोदींनी वृक्षतोडीवर भाष्य केलं होतं. हा व्हिडीओ मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमातील होता. यामध्ये मोदी बेअर ग्रिल्सला लाकडाचं महत्त्व आणि पावित्र्य सांगताना दिसत आहेत. 'तेव्हा उदरनिर्वाहासाठी काहीतरी करावं लागायचं. तेव्हा माझे काका विचार करत होते. चूल पेटवण्यासाठी जे लाकूड कामी येतं, त्या लाकडाचा व्यापार करू. त्यांनी दुकानासाठी जागा घेतली. त्यांनी ही गोष्ट आजीला सांगितली. आजीनं त्यांना रोखलं. ती नाही म्हणाली. उपाशी मरू, मजुरी करू. पण लाकडं विकायची नाहीत. कारण लाकडात जीव असतो. त्यामुळे आपण लाकडं कापू शकत नाही. त्यामुळे माझ्या आजीनं काकांना ते काम करू दिलं नाही. कारण आमच्यावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार आहेत', असं मोदींनी मॅन व्हर्सेस वाईल्डमध्ये बेअर ग्रिल्ससोबत संवाद साधताना म्हटलं होतं.