पंतप्रधान मोदींकडून मास्टरस्ट्रोक्सचा चौकार; भारताच्या हालचाली पाहून चिनी ड्रॅगन हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 07:51 PM2020-06-04T19:51:47+5:302020-06-04T19:59:55+5:30
पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती मोठ्या कौशल्यानं हाताळली. त्यामुळे चीनला दोन पावलं मागे सरकावं लागलं.
नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे जगभरात टीकेचा धनी झालेल्या चीननंलडाखमध्ये कुरघोड्या सुरू केल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनीचीनची कोंडी करण्यासाठी विविध स्तरावरून हालचाली सुरू केल्या. त्यामुळे चीन बराच बॅकफूटवर गेला आहे. चीन दोन दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर युद्धाभ्यास करत होता. चीनच्या सरकारी माध्यमांनी त्याचे फोटोदेखील प्रसिद्ध केले. मात्र त्यानंतर अचानक चीननं सावध पवित्रा घेतला आणि दोन पावलं मागे घेण्याची तयारी दर्शवली. यासाठी पंतप्रधान मोदींनी चार महत्त्वाची पावलं उचलली.
मोदींचा पहिला मास्टरस्ट्रोक- ट्रम्प यांच्यासोबतच्या संवादात चीनचा मुद्दा
अमेरिका आणि चीनचे संबंध सध्या अतिशय ताणले गेलेले आहेत. त्यातच लडाखच्या विषयावरून कुरघोड्या करत चीननं भारताच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीसाठी हात पुढे केला. पण भारतानं हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं म्हणत तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको, असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर चीननंदेखील लगेगच चर्चेतून प्रश्न सोडवू, अशी सामोपचाराची भाषा सुरू केली.
मोदींचा दुसरा मास्टरस्ट्रोक- चीनला त्यांच्याच शब्दात उत्तर
डोक्लाममध्ये कठोर भूमिका घेणाऱ्या भारतानं लडाखमध्येही तीच भूमिका कायम ठेवली. चीननं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवल्यानंतर भारतानं तातडीनं या भागात ५ हजार जवानांची अतिरिक्त कुमक पाठवली. भारतानं लडाख भागात मोठा शस्त्रसाठादेखील पाठवला. चर्चेतून प्रश्न सुटत नसेल, तर आम्ही दुसऱ्या पर्यायाचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट संदेश भारतानं दिला. त्यामुळे चीनचा आक्रमकपणा कमी झाला.
मोदींचा तिसरा मास्टरस्ट्रोक- भारत आपल्या निर्णयांवर ठाम
लडाखमध्ये मोठी आगेकूच करायची, भारतावर दबाव आणायचा आणि त्यांना मागे हटण्यास भाग पाडायचं, अशी चीनची व्यूहनीती होती. भारत दबावाखाली येऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लष्करी बांधकामं थांबवेल, असा चीनचा ग्रह होता. मात्र भारतानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील बांधकामं सुरूच ठेवली. चीनचा अंदाज साफ चुकला. त्यामुळे मग चीनकडून संवादाची, चर्चेची भाषा सुरू झाली.
मोदींचा चौथा मास्टरस्ट्रोक- लिडिंग फ्रॉम द फ्रंट
चीनसोबतचा तणाव वाढू लागताच पंतप्रधान मोदी पुढे सरसावले. त्यांनी लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. परिस्थितीचा आढावा घेतला. यातून चीनला अतिशय योग्य संदेश मिळाला. तीन वर्षांपूर्वी डोक्लाममधील वाद मिटवणाऱ्या टीमला मोदींनी पाचारण केलं. मोदींच्या चौफेर हालचालींमुळे चीनवरील दबाव वाढला आणि त्यांनी मागे हटण्याची तयारी दर्शवली.
चीनला धडा शिकवण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लान; समुद्रात ड्रॅगनला भारी पडणार
जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमानं
कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार