भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 08:04 PM2023-12-03T20:04:22+5:302023-12-03T20:06:36+5:30

'आजचा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या घमंडिया आघाडीसाठी मोठा धडा आहेत.'

PM narendra modi A corrupt government was ousted by voters; PM Modi strongly criticizes Congress | भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

नवी दिल्ली: आजच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "आजचा विजय ऐतिहासिक आणि अभुतपूर्वक आहे. आज 'सबका साथ, सबका विकास'ची भावना जिंकली आहे, आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला, आज भारताच्या विकासासाठी राज्यांचा विकास, या विचाराचा विजय झाला, आज इमानदारी, पारदर्शकता आणि सू-शानाचा विजय झाला," अशी भावना पीएम मोदींनी व्यक्त केली.

मोदी पुढे म्हणतात, "देशातील तरुणांना भ्रष्टाचाराची मोठी चीड आहे. ज्या सरकाराने तरुणांविरोधात काम केले, ते सरकार आज सत्तेतून बाहेर पडले आहे. हे सरकार पेपर लीक आणि जमीन घोटाळ्यांच्या आरोपात अडकले आहे. याचाच परिणाम या तिन्ही राज्यात सत्ताधारी बाहेर गेले. आज देशातील तरुणांमध्ये विश्वास वाढतोय, भाजप त्यांच्या इच्छा जाणतो आणि त्यांच्यासाठी काम करतो, हे देशातील तरुणांना माहिती आहे. भाजपचे सरकार तरुणांच्या हिताचे काम करते, नवीन संधी निर्माण करत आहे." 

"आज देशातील आदिवासी समाज भाजपकडे आशेने पाहतोय. काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला योग्य आदर दिला नाही. त्यामुळेच आदिवासी समाजाने काँग्रेसला हद्दपार केले. आदिवासी समाजाला विकास हवाय, त्यांना भाजपवरच विश्वास आहे. मी आज भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचेही आभार मानतो. तुमची निष्ठा, तुमचे समर्पण अतुलनीय आहे. डबल इंजिन सरकारचा मेसेज पूर्ण इमानदारीने लोकापर्यंत पोहोचवले. याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. आपले अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही दिवसरात्री काम केले. त्यांच्या कामामुळे आज आपल्याला हा निकाप पाहायला मिळतोय."

"फक्त विजयासाठी काहीही बोलणे, लालसेपोटी खोट्या घोषणा करणे, हे मतदारांना आवडत नाही. भारताच्या मतदारांना माहित आहे की, जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा राज्याची प्रगती होते आणि प्रत्येक कुटुंबाचे जीवन सुधारते. म्हणूनच ते सतत भाजपची निवड करत आहेत. हे निवडणूक निकाल काँग्रेस आणि त्यांच्या अहंकारी आघाडीसाठीही मोठा धडा आहेत. धडा असा आहे की, केवळ काही कुटुंबातील सदस्य मंचावर एकत्र आल्याने देशाचा विश्वास जिंकता येत नाही. देशातील जनतेची मने जिंकण्यासाठी राष्ट्रसेवेची भावना असली पाहिजे, ती घमंडिया आघाडीत नाही."

"भ्रष्टाचाराविरोधात काम करणाऱ्या संस्थांना बदनाम करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. त्या लोकांच्या मनात थोडीही देशभक्ती दिसत नाही. त्यामुळेच लोकांनी तुम्हाला हद्दपार केले आहे. लोकशाहीच्या हितासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना माझा आणखी एक सल्ला आहे. कृपया देशविरोधी आहे, देशाचे विभाजन आणि देशाला कमकुवत करणारे राजकारण करू नका," असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. 

Web Title: PM narendra modi A corrupt government was ousted by voters; PM Modi strongly criticizes Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.