“संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त, पण व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 02:27 PM2023-10-13T14:27:30+5:302023-10-13T14:29:36+5:30

PM Narendra Modi News: अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, ते जगालाही पटू लागले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

pm narendra modi addressed p 20 in new delhi and said whole world is suffering from terrorism but it is very sad that there is no consensus | “संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त, पण व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक”: PM मोदी

“संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त, पण व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक”: PM मोदी

PM Narendra Modi News: आताची वेळ सर्वांच्या विकासाची आणि कल्याणाची आहे. जागतिक विकासाच्या आड येत असलेल्या संकटावर मात करून मानवकेंद्रित विचारसरणीने आपल्याला पुढे जायचे आहे. जगाकडे एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक आत्मा या दृष्टीकोनातून पाहावे. भारताला अनेक दशकांपासून सीमेपलीकडील दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. दहशतवाद्यांनी हजारो निष्पाप लोकांची हत्या केली आहे. आमच्या संसदेलाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. दहशतवादी खासदारांना ओलीस घेऊन त्यांचा खात्मा करण्याच्या तयारीत होते. अशा अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त आहे. मात्र, दहशतवादाच्या परिभाषेबाबत एकमत होत नाही हे दुःखद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्लीत आयोजित जी-२० संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. हे संमेलन एक प्रकारे जगभरातील संसदीय प्रक्रियांचे महाकुंभ आहे. शांतता, बंधुभाव जोपासण्याचा काळ असून, सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

दहशतवाद हे मोठे आव्हान, याची जगालाही जाणीव

दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, हे आता जगालाही पटू लागले आहे. जगभरात कुठेही दहशतवाद घडो, त्याचे कारण, स्वरुप काहीही असो, तो मानवतेच्या विरोधातच असतो. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी दहशतवादाबाबत सातत्याने कठोर राहावे. दहशतवादाच्या व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक आहे. दहशतवादासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनांमध्ये एकमत व्हायला हवे. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात आपण एकत्र कसे काम करू शकतो, याचा विचार जगभरातील संसद आणि प्रतिनिधींना करावा लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

दरम्यान, भारताची संसदीय प्रक्रिया काळानुरूप सुधारली आहे. दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही सुद्धा भारतात आहे. हे चर्चेसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. तसेच, भारतातील सार्वत्रिक निवडणुका एखाद्या सणासारख्या असतात. स्वातंत्र्यानंतर भारतात १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


 

Web Title: pm narendra modi addressed p 20 in new delhi and said whole world is suffering from terrorism but it is very sad that there is no consensus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.