अयोध्या प्रकरणावर मोदींची 'मन की बात'; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 12:24 PM2019-10-27T12:24:15+5:302019-10-27T12:45:46+5:30
अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल पुढील महिन्यात येण्याची शक्यता
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये सरदार पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करत अयोध्या प्रकरणावर भाष्य केलं. सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यावेळी देश एकता आणि अखंडतेच्या बाबतीत किती सतर्क आहे, याची प्रचिती आली. २०१० मध्ये न्यायालयानं राम मंदिर प्रकरणी निकाल दिला. त्यावेळी काहींनी वाचाळपणा केला. मात्र संपूर्ण देशातील जनतेनं आनंददायक बदल अनुभवला, असं मोदी 'मन की बात'मध्ये म्हणाले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार, समाज, साधू-संतांनी अतिशय शांतपणे प्रतिक्रिया दिल्या. निकालाचा दिवस जेव्हा जेव्हा मला आठवतो, तेव्हा अतिशय आनंद होतो. त्यावेळी देशानं न्यायालयाच्या निर्णयाचा, प्रतिष्ठेचा सन्मान केला होता. तो क्षण आमच्यासाठी कायम एक उत्तम उदाहरण असेल, असं मोदी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून नोव्हेंबरमध्ये निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
मन की बातमध्ये मोदींनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांचादेखील उल्लेख केला. हैदराबाद आणि जुनागढचं नव्हे, तर लक्षद्विपसारख्या बेटाचंही भारतात विलीनीकरण व्हावं यासाठी प्रयत्न केले. लक्षद्विपचं विलीनीकरण करून पटेल यांनी शेजारी देशाचे मनसुबे धुळीस मिळवले. पटेल यांची नजर चौफेर होती. त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रदेशांसोबतच लक्षद्विपसारख्या भागांचीदेखील चिंता होती, असं मोदी म्हणाले.