राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना PM मोदींचा सल्ला; म्हणाले, “शब्द काळजीपूर्वक वापरा”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 03:09 PM2022-07-09T15:09:44+5:302022-07-09T15:10:48+5:30
शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी काही कारणास्तव शपथ घेऊ शकले नाहीत, असे सांगितले जात आहे.
नवी दिल्ली: शिवसेनेतील मोठे ऐतिहासिक बंड होण्यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता २७ नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी पार पडला. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या खासदारांशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ सभागृहात नियमित राहावे, सभागृहात तयारी करुन यावे तसेच शब्द जपून वापरावेत, असा सल्ला मोदी यांनी नव्या खासदारांना दिला. राज्यसभेत निवड झालेल्या खासदारांमध्ये निर्मला सीतारामन, पीयुष गोयल अशा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून निवडून आलेल्या भाजपच्या खासदारांनीही गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये पीयूष गोयल, अनिल बोंडे तसेच धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. महाडिक आणि बोंडे यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी हे काही कारणास्तव शपथ घेऊ शकले नाहीत.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत राज्यभेसाठी निवड झालेल्या एकूण २७ खासदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी पीयूष गोयल आणि नीर्मला सीतारामन यांच्यासोबतच भाजपाच्या सुरेंद्र सिंग नागर, के लक्ष्मण, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि कल्पना सैनी आदी नेत्यांनी शपथ घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन केले आहे. सभागृहात नियमित उपस्थित राहावे, शब्दांची निवड जपून करावी, असे मोदी यांनी खासदारांना सांगितले. तसेच यावेळी मोदी यांनी खासदारांना त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करुन दिल्याचे सांगितले जात आहे.