पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते अतिरेक्यांच्या निशाण्यावर; बिहारच्या नेत्यांनाही धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 06:13 AM2022-07-21T06:13:49+5:302022-07-21T06:14:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएसच्या अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहेत. एका मासिकात भाजप नेत्यांवरील हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएसच्या अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहेत. एका मासिकात भाजप नेत्यांवरील हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनंतर बिहार पोलीस मुख्यालयाने सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून सतर्क राहण्यास सांगितले आहे. टेलिग्राम चॅनेलवरील एका पोस्टनुसार अन्सार गजावातुल हिंदचा नवा अंतरिम कमांडर अमीर गाजी खालिद इब्राहिमने युवकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. खुरासन डायरीने ट्वीटरवर १४ जुलै रोजी आयएस खुरासन प्रांताचे कव्हर पेज शेअर केले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. व्हाईस ऑफ खुरासनमध्ये भाजपच्या विरोधात हल्ल्यांचा उल्लेख आहे, अशा स्थितीत जिल्हा पोलिसांनी कोणत्याही अप्रिय घटनेपासून बचावासाठी सुरक्षा व इतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत.
बिहारमध्ये भाजपचे अनेक नेते अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात भाजपचे ७७ आमदार आहेत. हरिभूषण ठाकूर बचौल, संजीव चौरसिया, संजय सिंह व पवन जायस्वाल यांना भाजप आमदारांत फायर ब्रांड मानले जाते. केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह व अश्विनी चौबे यांना केंद्राने आधीच झेड दर्जाची सुरक्षा दिलेली आहे. बिहारमध्ये केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून वाद झाला होता व भाजप नेत्यांना निशाणा बनविण्यात आले होते, तेव्हा खा. संजय जायस्वाल व संजीव चौरसिया यांना केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती.
टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश
पाटण्याच्या फुलवारी शरीफमध्ये टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर व आरोपी देशद्रोही आहेत, असे सांगितल्यानंतरही त्यांना लवकर जामीन मिळू शकतो. याचे कारण म्हणजे पोलिसांनी आरोपींविरूद्ध यूएपीए कायदा लावलेला नाही. याबाबत कायदेतज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करीत आहेत. यासंबंधी १२ व १४ जुलै रोजी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांत अनेक गुन्हे या प्रकरणात लावण्यात आले आहेत. परंतु यूएपीए कायदा लावलेला नाही.