PM Narendra Modi in Webinar: “केंद्र सरकारप्रमाणे कॉर्पोरेट विश्वानेही गुंतवणूक वाढवावी”; पंतप्रधान मोदींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 03:04 PM2023-03-07T15:04:56+5:302023-03-07T15:06:13+5:30
PM Narendra Modi in Webinar: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वेबिनारला संबोधित करताना कॉर्पेरेट जगताला गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले.
PM Narendra Modi in Webinar: अलीकडेच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. आगामी आर्थिक वर्षापासून या संकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात येईल. मात्र, यातच देशाचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी एका वेबिनारला संबोधित करताना, कॉर्पोरेट विश्वाला गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारप्रमाणे कॉर्पोरेट विश्वानेही गुंतवणूक वाढवावी, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक क्षेत्र या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. सरकारने भांडवली खर्चाची तरतूद १० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही तरतूद आतापर्यंतची सर्वोच्च आहे. देशाच्या खाजगी क्षेत्राला आवाहन करतो की, सरकारप्रमाणेच त्यांनीही आपली गुंतवणूक वाढवावी जेणेकरुन देशाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
जीएसटीमुळे कर प्रक्रियेत बरीच सुधारणा झाली
जीएसटीमुळे कर प्रक्रियेत सुधारणा झाली आहे. एकेकाळी सगळीकडे चर्चा व्हायची की, भारतात कर किती जास्त आहे. मात्र, आता परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे. जीएसटीमुळे, आयकर कमी झाला, कॉर्पोरेट कर कमी झाला. यामुळे भारतातील करभार कमी झाला. परिणामी नागरिकांवरील बोजा कमी होत आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. सन २०१३-१४ मध्ये आपला एकूण कर महसूल सुमारे ११ लाख कोटी होता. जो आता सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात २०० टक्क्यांनी वाढून एकूण कर महसूल अंदाजे ३३ लाख कोटींवर गेला आहे. वैयक्तिक इन्कम टॅक्स रिटर्नची संख्या २०१३-१४ मध्ये ३.५ कोटींवरून २०२०-२१ मध्ये ६.५ कोटी इतकी वाढली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकल्पाच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये अभूतपूर्व गती आली आहे. विविध भौगोलिक आणि आर्थिक क्षेत्रांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या खाजगी क्षेत्राला पाठिंबा द्यायला हवा. भारत आर्थिक शिस्त, पारदर्शकतेसह वाटचाल करत आहे, त्यामुळे आपणही मोठा बदल पाहत आहोत. ज्याप्रमाणे आम्ही एमएसएमईला पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे भारताच्या बँकिंग प्रणालीला अधिकाधिक क्षेत्रांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"