मोदींनाही बसला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; पहिल्यांदाच 50 टक्क्यांच्या खाली उतरला लोकप्रियतेचा ग्राफ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:54 AM2021-05-18T10:54:33+5:302021-05-18T10:54:42+5:30
मोदींचे अॅप्रूव्हल रेटिंग गेल्या 1 एप्रिलपूर्वी 73 टक्के होती, ती आता ११ मेरोजी 63 टक्क्यांवर आली आहे! ...तरी 'या' 13 देशांच्या राष्ट्रप्रमुखांत मोदींच No.1!
नवी दिल्ली - कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या नियोजनावरून केंद्रातील मोदी सरकारचे संपूर्ण जगात कौतुक झाले. मात्र, आता देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नियोजनावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. कोरोना महामारीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला, तसाच तो पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेलाही बसला आहे. यासंर्भात, मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या ‘ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंगनुसार आणि भारतीय पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, मोदींची लोकप्रियता घसरली आहे. विशेष म्हणजे ओआरमॅक्सच्या सर्वेक्षणात तर मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख थेट 50 टक्क्यांच्याही खाली आला आहे.
पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाचे सर्वेक्षण -
सर्वप्रथम, भारतातील पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाने केलेल्या सर्वेक्षणाचा विचार करता, मोदींची लोकप्रियता काही प्रमाणात घसरली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी मोदींची लोकप्रियता 57 टक्क्यांवर होती. मात्र 11 मेपर्यंत ती 9 टक्क्यांनी घसरून 50 टक्क्यांच्याही खाली म्हणजे 48 टक्क्यांवर आली, असे संस्थेने म्हटले आहे. विशेष म्हणजे मोदींच्या लोकप्रियतेचा ग्राफ पहिल्यांदाच 50 टक्क्यांच्या खाली आला आहे. ओआरमॅक्स मिडियाने 23 राज्यांमधील काही निवडक शहरांत हे सर्वेक्षण केले.
मार्निंग कन्सल्टची ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंग -
मार्निंग कन्सल्ट ही ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिका, या 13 देशांच्या राष्ट्र प्रमुखांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा कत असते. तसेच या देशात सर्वसामान्याचे प्रमुख नेत्यांबद्दल नेमके काय मत आहे, हेही ही कंपनी जाणून घेत असते. नुकत्याच समोर आलेल्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंग’नुसरा, मोदींची लोकप्रियता तब्बल 10 टक्क्यांनी घसरली आहे.
मोदींचे अॅप्रूव्हल रेटिंग 73 टक्क्यांहून 63 टक्क्यांवर -
मोदींचे अॅप्रूव्हल रेटिंग गेल्या 1 एप्रिलपूर्वी 73 टक्के होती, ती आता ११ मेरोजी 63 टक्क्यांवर आली आहे. याच बरोबर मोदींच्या डिसअॅप्रूव्हल रेटिंगचा विचार करता, यात 10 टक्क्यांची वाढ झाली असून एक मेपूर्वी 21 टक्क्यांवर असणारी ही रेटींग 11 मेनंतर 31 टक्क्यांवर गेली आहे. मात्र, असे असले तरी मोदी या 13 देशांच्या राष्ट्र प्रमुखांच्या रेटींगचा विचार करता पहिल्याच स्थानावर आहेत.
“घरात नाही दाणा पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा…" ; रुपाली चाकणकरांचे मोदी सरकारवर टीकास्र
...तेव्हा ६९ टक्क्यांवर गेला होता मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख -
तत्पूर्वी, चीनसोबतच्या वादादरम्यान मोदी सरकारने चिअॅप्सवर बंदी आणली होती, त्यावेळी ओआरमॅक्स मिडियाने केलेल्या सर्वेक्षणात मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख जवळपास ६९ टक्क्यांवर गेला होता.