सर्व मंत्र्यांनी वेळेत कार्यालयात पोहोचा अन् तिथूनच काम करा, मोदींच्या मंत्र्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 10:33 AM2019-06-13T10:33:42+5:302019-06-13T10:58:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वेळेत कार्यालयात पोहोचण्याचा सल्ला दिला
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सांगतात की, काम करत राहणं हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. ज्या पद्धतीनं मोदींना जनाधार प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी कामाचा झपाटाही वाढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वेळेत कार्यालयात पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मंत्र्यांनी घरातून काम करणं टाळावं अन् सकाळी 9.30पर्यंत आपापल्या कार्यालयात पोहोचावं, अशा सूचना मोदींनी मंत्र्यांना दिल्या होत्या.
मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा अधिकाऱ्यांबरोबरच वेळेत कामावर पोहोचत होतो. त्याचा प्रभाव प्रशासनाच्या खालच्या स्तरावरही जाणवत होता. फायलींचा निपटारा करण्यासाठी कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्या सहाय्यक मंत्र्यांनी एकत्र बसून प्रस्तावांना मंजुरी दिली पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. वेळेत कामावर पोहोचण्याचा सल्ला देत मोदी म्हणाले, सर्वच मंत्र्यांनी कार्यालयात पोहोचल्यानंतर काही मिनिटं वेळ काढून अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयातील कामकाज समजून घेतलं पाहिजे. तसेच पक्षाच्या खासदारांनी जनतेला भेटत राहिलं पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ ग्रहण करण्यापूर्वीही सेंट्रल हॉलमध्ये खासदारांना काही सल्ले दिले होते. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधानं करणं चूक आहे. अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. दिल्लीतली परिस्थिती नव्या खासदारांना एकदम समजणार नाही, त्यामुळे वरिष्ठ खासदारांनी त्यांना सांभाळून घेण्याची गरज आहे.