नरेंद्र मोदी मोठे अभिनेते; ते बॉलिवूडमध्ये असते तर..; केरळा स्टोरीवरुन ओवैसींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:10 PM2023-05-08T15:10:37+5:302023-05-08T15:11:29+5:30
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे अभिनेते आहेत, ते बॉलिवूड मध्ये असते तर सर्व अभिनेते फिके पडले असते, असे म्हणत MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर बोचरी टीका केली.
बॉलिवूड चित्रपट 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) ला विरोध आणि समर्थन होत असून या चित्रपटाची आता सोशल मीडियावरही चर्चा होतेय. काही राज्यांमध्ये फिल्मला पाठिंबा मिळतोय तर काही राज्यांत विरोध होतोय. भाजप नेत्यांकडून अनेक ठिकाणी या चित्रपटाचे समर्थन करण्यात आले असून मोफत स्क्रिनींगही होत आहे. मध्य प्रदेशात हा चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर आता महाराष्ट्रातील भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या चित्रपटाचे मोफत स्क्रिनिंग ठेऊन चित्रपटाला समर्थन दर्शवलं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या चित्रपटावर भाष्य केलंय. त्यावरुन, आता एमआयएम पक्षाचे खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी मोदींवर टीका केलीय.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे अभिनेते आहेत, ते बॉलिवूडमध्ये असते तर सर्व अभिनेते फिके पडले असते, असे म्हणत MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर बोचरी टीका केली. देशात चाललेल्या समस्यांकडे लक्ष न देता ते सिनेमाचे प्रमोशन करीत आहेत. आपण इतिहास विसरतो. हिटलरने ज्यूंच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे नकारात्मक भावना लोकांच्या मनात निर्माण केली आणि ७० लाख ज्यूंची हत्या करण्यात आली. आता, भारतात सिनेमाच्या माध्यमातून खोटे-नाटे प्रयोग केले जात आहेत. पोट भरण्यासाठी मुस्लिमांची प्रतिमा खराब दाखवली जात आहे, असे म्हणत द केरला स्टोरी चित्रपटावरही औवेसींनी भाष्य केलं.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक निवडणुकांमुळे कर्नाटकच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, जनसभेला संबोधित करताना द केरला स्टोरी चित्रपटावर मोदींनी भाष्य केलं. केरला स्टोरी हा चित्रपट दहशतवादाच्या कटकारस्थानावर आधारित आहे. दहशतवादाचं विक्षिप्त सत्य समोर आणण्याचं काम चित्रपट करतोय. दशवाद्यांचं डिझाईन सर्वांसमोर मांडतोय. काँग्रेस दहशतवादावर आधारित या चित्रपटाला विरोध करत आहे, आणि दहशतवादी प्रवृत्तीसोबत उभी आहे. काँग्रसने वोट बँकेसाठी दहशवादाला थारा दिलाय, असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर असदुद्दीन औवेसींनी उत्तर दिलंय.
कांदिवलीत मोफत स्क्रिनींग
दरम्यान, महाराष्ट्रात काही ठिकाणी राजकीय तसेच विविध संघटनांकडून ‘द केरला स्टोरी’चे मोफत शो आयोजित करण्यात येत आहेत. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही चित्रपटाच्या एका खास शोचे आयोजन ७ मे रोजी कांदिवलीतील एका थेअटरमध्ये केले होते. लव्ह जिहादचा बुरखा फाडणारच... असे म्हणत त्यांनी या शोचे मोफत आयोजन केले होते.