काँग्रेसच्या प्रयत्नांनंतर मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन; नितीश कुमारांचीही प्रतिक्रिया आली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 02:04 PM2024-06-04T14:04:09+5:302024-06-04T14:04:43+5:30
Lok sabha Election Latest Update: एनडीएला २८८ जागांवर लीड मिळत आहे तर इंडी आघाडीला २३७ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. परंतु, एनडीएमधील भाजपनंतर दोन मोठे पक्ष ठरणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्यावरच सारी भिस्त राहणार आहे.
केंद्रातील सत्तेत जाण्याची चावी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या हाती आली आहे. या मुळे या दोन्ही नेत्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केले असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागलीच नायडूंना फोन केल्याचे समजते आहे.
हे दोन्ही नेते कोणत्याही क्षणी पलटी मारणारे आहेत. एनडीएला २८८ जागांवर लीड मिळत आहे तर इंडी आघाडीला २३७ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. परंतु, एनडीएमधील भाजपनंतर दोन मोठे पक्ष ठरणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्यावरच सारी भिस्त राहणार आहे. एनडीएला बहुमताचा आकडा घासून मिळताना दिसत असला तरी भाजपा सध्या २३६ जागांवरच आघाडीवर आहे. म्हणजे उर्वरित आकडा हा मित्रपक्षांचा आहे. तर इंडी आघाडीला २३७ जागांवर लीड दिसत असले तरी काँग्रेस ९८ जागांवरच आघाडीवर आहे. यामुळे सत्ता स्थापनेला जागा कमी पडल्या तर मोठी फोडाफोडी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीय.
चंद्राबाबू नायडूंनी आपण एनडीएतच राहणार असल्याचा शब्द मोदींना दिला आहे. मोदींनी नायडूंना आंध्र प्रदेश जिंकल्याबाबत अभिनंदन केले आहे. दुसरीकडे चंद्राबाबू नायडूंना स्वत: सोनिया गांधी फोन करणार असल्याची माहिती आहे. यामुळे चंद्राबाबू नायडू प्रत्यक्षात काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर नितीश कुमारांनी देखील आपण भाजपसोबत राहणार असल्याचे म्हटल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.
भाजपाला राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये चांगलाच फटका बसला आहे. यामुळे गेल्यावेळी एकट्याने बहुमताचा आकडा पार करणाऱ्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आता मित्रपक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. २०१९ मध्ये शिवसेना, अकाली दलासारखे मोठे मित्रपक्ष भाजपाची साथ सोडून निघून गेले होते. तरीही बहुमत असल्याने त्याचा परिणाम भाजपावर झाला नव्हता. परंतु आता बहुमताचा आकडा स्वत:च्या जिवावर गाठणे कठीण असून सत्ताकेंद्रही आता बदलण्याची शक्यता आहे.