PM नरेंद्र मोदींनी केला शेख हसीना यांना फोन, बांगलादेश निवडणुकीत ऐतिहासिक विजयाबद्दल केले अभिनंदन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 07:37 PM2024-01-08T19:37:54+5:302024-01-08T19:55:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शेख हसीना यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आणि निवडणूक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
नवी दिल्ली : बांगलादेशच्या राष्ट्रीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर शेख हसीना पाचव्यांदा देशाच्या पंतप्रधान बनण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांची ही सलग चौथी टर्म असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शेख हसीना यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आणि निवडणूक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, "पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी चर्चा केली. सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यशस्वी निवडणुकांसाठी मी बांगलादेशच्या जनतेचेही अभिनंदन करतो. बांगलादेशसोबतची आमची भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."
तत्पूर्वी, बांगलादेशच्या राष्ट्रीय निवडणुकीत अवामी लीगच्या ऐतिहासिक विजयानंतर शेख हसीना यांनी पत्रकार परिषदेत भारताला खरा मित्र म्हटले होते. भारत बांगलादेशचा खूप चांगला आणि सच्चा मित्र आहे. 1971 आणि 1975 मध्ये त्यांनी आम्हाला साथ दिली. आम्ही भारताला आपला शेजारी मानतो. भारतासोबत आमचे चांगले संबंध आहेत, याचे मला खरोखर कौतुक वाटते, असे शेख हसीना म्हणाल्या.
याचबरोबर, भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध भविष्यात अधिक उंचीवर नेण्याच्या आपल्या संकल्पाचा शेख हसीना यांनी पुनरुच्चार केला. तसेच, शेख हसीना यांनी 2041 पर्यंत बांगलादेशला विकसित राष्ट्र बनवण्याचे त्यांचे व्हिजन मीडियासमोर मांडले. दरम्यान, बांगलादेशच्या 300 जागांच्या संसदेत एकूण 299 जागांसाठी निवडणूक झाली. हसीनाचा पक्ष अवामी लीगने 223 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले. एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने एका जागेवर निवडणूक झाली नाही. त्या जागेवर नंतर पोटनिवडणूक होणार आहे.
माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकला. यादरम्यान, पत्रकार परिषदेत ख हसीना म्हणाल्या की, 'जे दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत किंवा बेकायदेशीर कामात गुंतलेले आहेत त्यांना निवडणुकीची भीती वाटते. ते निवडणूक लढविण्याचे टाळतात. आम्ही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करू शकलो याचा मला आनंद आहे.