PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार, लष्करी तयारीचा आढावाही घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 08:29 AM2021-11-04T08:29:32+5:302021-11-04T08:30:30+5:30
PM Narendra Modi to celebrate Diwali with Army jawans : नरेंद्र मोदी राजौरीमध्ये तीन ते चार तास थांबण्याची शक्यता आहे. यादरम्यान ते जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा आढावाही घेणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यंदाची दिवाळी (Diwali) जवानांसोबत साजरी करणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरामध्ये एलओसीच्या फॉरवर्ड पोस्टवर जवानांसोबत नरेंद्र मोदी दिवाळी साजरी करणार आहेत. 2019 मध्येही नरेंद्र मोदी यांनी राजौरीमध्ये दिवाळी साजरी करून जवानांचे मनोबल वाढवले होते. यंदाची दिवाळी म्हणजेच आज (गुरुवार) नरेंद्र मोदींचा एलओसीच्या नौशेरा सेक्टरमध्ये दौरा प्रस्तावित आहे. दरम्यान, राजौरी-पुंछ सीमा भागात दहशतवाद्यांविरोधात तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता नौशेरा येथे पोहोचणार आहेत. पहिल्यांदा ते जम्मू विमानतळावर येतील, तेथून ते नौशेराकडे रवाना होतील. नरेंद्र मोदी राजौरीमध्ये तीन ते चार तास थांबण्याची शक्यता आहे. यादरम्यान ते जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा आढावाही घेणार आहेत. याशिवाय सुरक्षेसंदर्भात बैठकही प्रस्तावित आहे.
मोदींनी याआधीही जवानांसोबत केलीय दिवाळी साजरी
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी चौथ्यांदा जम्मू-काश्मीर आणि लडाख सीमेवर दिवाळी साजरी करणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2014 मध्ये सियाचीनला भेट दिली होती. येथे दिवाळी साजरी केल्यानंतर ते श्रीनगरलाही गेले. 2017 मध्ये त्यांनी काश्मीरमधील बांदीपोरा येथे लष्कर आणि बीएसएफच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. 2019 मध्ये ते राजोरीच्या इन्फंट्री डिव्हिजनमध्ये गेले होते, जिथे त्यांनी लष्करातील जवानांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला होता. तसेच 2020 मध्ये नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील जैसलमेर येथे असलेल्या लोंगावाला सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
दौऱ्याबाबत सुरक्षा दलांना सतर्क
राजोरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या घनदाट जंगलात तीन आठवड्यांपासून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबाबत सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. 11 ऑक्टोबर रोजी चामरेड जंगलात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जेसीओसह पाच जवान शहीद झाले होते. यानंतर, मेंढार येथील भटादुडिया येथे दुसरा हल्ला झाला, ज्यात जेसीओसह चार जवान शहीद झाले. आतापर्यंत हा हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याचा शोध लागलेला नाही.
नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा!
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "दिवाळीच्या या पवित्र वेळी देशवासीयांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा! माझी इच्छा आहे की, प्रकाशाचे हे पर्व तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख, संपन्नता आणि सौभाग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा! Wishing everyone a very Happy Diwali." असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.