Yaas Cyclone : 'यास' चक्रीवादळ 'या' दिवशी धडकणार, भीषण रूप घेणार; पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 04:53 PM2021-05-23T16:53:00+5:302021-05-23T17:04:24+5:30
Yaas Cyclone And Narendra Modi : यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
नवी दिल्ली - तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर संपत नाही तोच भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आणखी एका मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. "यास" चक्रीवादळ (Cyclone Yaas) पूर्वेकडील बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये, केंद्रीय मंत्रालय आणि संस्थांच्या तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोदींनी समुद्र किनाऱ्यावरील नागरिक, उद्योगांशी संपर्क करावा बचाव कार्यासाठी तयारी करावी. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावं, असे निर्देश दिले आहेत. तसेच वीजपुरवठा आणि टेलिफोन यंत्रणा बंद करण्याचा कालावधी हा कमी-कमी ठेवण्याची सूचनाही मोदींनी केली. यास चक्रीवादळ हे 26 मे रोजी संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्यानेने म्हटलं आहे.
PM Narendra Modi attends meeting with senior govt officials & reps from National Disaster Management Authority, Secretaries from Telecom, Power, Civil aviation, Earth Sciences Ministries reviewing preparations against approaching #CycloneYaas
— ANI (@ANI) May 23, 2021
Union HM Amit Shah was also present pic.twitter.com/612KZ6mr0y
राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसह केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे. एनडीआरएफने स्थितीचा सामना करण्यासाठी 46 पथकं तैनात केली आहेत. 13 टीम तैनातीसाठी एअरलिफ्ट करण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या 10 टीम स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवांनी 22 मे रोजी किनारपट्टीवरील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि संबंधित मंत्रालय आणि संस्थांसोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान समितीची बैठक घेतल्याचं मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचावकार्यासाठी जहाजं आणि हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ओमानने या चक्रीवादळाचे नाव यास असे ठेवले आहे. बंगालच्या उपसागरातील, अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंशांनी वाढले आहे. सध्या ते 31 डिग्री सेल्सिअस आहे. असे असले तरीदेखील यास चक्रीवादळ तौक्ते एवढे ताकदवर नाहीय. हे वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने येत आहे, असे अर्थ सायन्सेस मिनिस्ट्रीचे सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले आहे. तौत्के चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यत या वादळामुळे 66 जणांचा मृत्यू झाला असून अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कामगारांची बोट उलटून मोठी दुर्घटना देखील घडली आहे. यामध्ये 14 जणांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. तर 184 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील किनारी भागातील जिल्ह्यांचे मोठे नुकसान केले आहे. घरांवरील छपरे उडून गेली आहेत. जागोजागी झाडे कोसळली आहेत.