शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी कोणामुळे मिळाली नाही? PM मोदींनी थेट नावच घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:55 PM2023-08-09T14:55:14+5:302023-08-09T14:59:16+5:30
PM Narendra Modi: २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत NDAचा विजय होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची INDIA आघाडी आणि सत्ताधारी NDA मध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी यांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, याचे कारण सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचा आहे. त्याचसोबत आगामी निवडणुकीसाठी खासदारांना कानमंत्र दिले. या बैठकीत मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. जे पक्ष एनडीएत सहभागी होतात त्यांचे स्वागत आहे. आम्हाला एनडीएचा विस्तार करायचा आहे. देशाच्या विकासाच्या मार्गावर महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण राज्य आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी कोणामुळे मिळाली नाही?
काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, असे विधान पंतप्रधान मोदींनी या बैठकीत केल्याचे समजते. काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले, अशी माहिती देण्यात आली. सत्तेत असताना चुकीची कामे करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. नंतर निवडणूक प्रचारावेळी या नेत्यांनी केलेल्या चुकांची माफीही मागितली. काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही. २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय होणार असल्याचा विश्वास मोदी यांनी बोलून दाखवला.
दरम्यान, आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करत राहिले. आम्ही एकत्रित निवडणूक लढवल्या आणि जिंकल्याही. सत्तेत असतानाही शिवसेना टीका करायची. विनाकारण वाद उकरून काढायची. आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात, अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी केली.