16 जानेवारीला नरेंद्र मोदी कोरोना लसीकरणची मोहीम सुरू करणार, को-विन अॅपही लाँच केलं जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 02:24 PM2021-01-13T14:24:34+5:302021-01-13T14:27:23+5:30
corona vaccination : राजधानी दिल्लीत लोकनारायण जय प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होईल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते को-विन अॅप देखील लाँच करण्यात येणार आहे. 16 जानेवारीपासून देशात कोरोना व्हायरसच्या विरोधात लसीकरणांची मोठी मोहीम सुरू होणार आहे.
सुत्रांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअलरित्या या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेची सुरूवात करण्याची शक्यता आहे. यादरम्यान, देशातील विविध राज्यात एकाच वेळी लसीकरण सुरू केले जाणार आहे.
राजधानी दिल्लीत लोकनारायण जय प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन या कार्यक्रमास उपस्थित राहू शकतात.
याशिवाय, कोरोना लस साठवलेल्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही ही मोहीम सुरू केली जाईल. दरम्यान, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसांना मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी लसीचा पुरवठा सुरू झाला होता आणि आता ही लस देशातील प्रत्येक राज्यात दिली जात आहे.
16 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाचे काम भारतात अनेक टप्प्यात करावे लागणार आहे. सध्या 3 कोटी कोरोना वॉरियर्सना लस दिली जाईल. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्स, 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या लोकांना ही लस दिली जाणार आहे.
लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज
महाराष्ट्रातही लसीकरण्याच्या पार्श्वभूमीवर लसी पोहोचल्या आहेत. लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आनंद व्यक्त केला. लस आपल्या पुण्याच्या मुख्य डेपोतून आपल्या आठ ठिकाणी पोहोचत आहेत. आठ डेप्युटी ऑफिसमध्ये मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद, नागपूर, अकोला या ठिकाणी लस पोहोचणार आहे. या ठिकाणी 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमान कायम ठेवता येईल, असे बॉक्स घेऊन अधिकारी येतील. त्यांच्या जिल्ह्याच्या कोटा त्या ठिकाणाहून नेला जाणार. ही प्रक्रिया 14 तारखेपर्यंत पूर्ण होईल. 15 तारखेपर्यंत सर्व रुग्णालयांमध्ये कोल्ड चेन युनिट असलेल्या ठिकाणी या लसी पोहोचतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
नोंदणीनुसार प्रत्येक केंद्रात 100 जणांना लस
कोरोनाची लस फ्रंटलाइन वर्कर्स यांना देण्यात येणार आहे. कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोबाइलवर संदेश आल्यानंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन लस दिली जाणार आहे. एका दिवशी एका केंद्रात जवळपास 100 जणांना कोरोना लस देण्यात येणार आहे, असे राज्यातील आरोग्य विभागाने स्पष्ट केले.