देशात कसं होणार कोरोना लसीकरण?; पंतप्रधान मोदींना सांगितला संपूर्ण प्लान

By कुणाल गवाणकर | Published: November 24, 2020 04:21 PM2020-11-24T16:21:48+5:302020-11-24T16:22:15+5:30

PM Modi on Corona Vaccine: पंतप्रधान मोदींनी दिली कोरोना लसीबद्दलची महत्त्वाची माहिती

pm narendra modi explains covid 19 vaccination program in india | देशात कसं होणार कोरोना लसीकरण?; पंतप्रधान मोदींना सांगितला संपूर्ण प्लान

देशात कसं होणार कोरोना लसीकरण?; पंतप्रधान मोदींना सांगितला संपूर्ण प्लान

Next

नवी दिल्ली: देशाच्या काही राज्यांमधील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक बाजारांमध्ये गर्दी दिसली होती. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं चिंता वाढली आहे. केंद्रानं काही राज्यांमध्ये वैद्यकीय पथकं पाठवली आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं आता सगळ्यांचं लक्ष लसीकडे लागलं आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महत्त्वाची माहिती दिली.




कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल याची वेळ आम्ही निश्चित करू शकत नाही. ही बाब पूर्णपणे शास्त्रज्ञांच्या हातात आहे. काही लोक याबाबत राजकारण करत आहेत. मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून रोखता येणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोना लस सर्वांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. त्या दृष्टीनं सरकार पावलं उचलत आहे. प्रत्येकापर्यंत कोरोना लस पोहोचणं हेच आमचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं.




कोरोना लस सर्वात आधी कोणाला मिळणार, यावरही मोदींनी भाष्य केलं. आघाडीवर राहून कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राथमिकता द्यायला हवी. कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेच पूर्ण पारदर्शकता असेल, अशी ग्वाही मोदींनी दिली. कोरोना लस एकदा द्यावी लागेल की दोनदा, त्या लसीची किंमत किती असेल, हे अद्याप निश्चित झालेलं नाही, असं पंतप्रधान म्हणाले.




कोरोना लसीच्या वितरणासाठी राज्यांसोबत मिळून काम सुरू आहे. लवकरच यासाठी संपूर्ण योजना तयार करण्यात येईल. कोरोना लसीकरणाची प्रक्रिया बराच काळ चालेल. त्यासाठी आपल्याला एक टीम म्हणून काम करावं लागेल, असं मोदींनी सांगितलं. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मृत्यूदर घटला आहे. त्यामुळे अनेक जण पुरेशी काळजी घेत नाहीत. कोरोनातून बरं होता येतं असा विचार करून खूप जण बेजबाबदारपणे वागत आहेत. अशी वर्तणूक आपल्याला परवडणारी नाही, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: pm narendra modi explains covid 19 vaccination program in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.