गादीऐवजी चटईवर झोपणं, जेवणाऐवजी केवळ फलाहार...; प्राणप्रतिष्ठेसाठी नरेंद्र मोदींचा कठोर तप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:07 PM2024-01-18T18:07:00+5:302024-01-18T18:07:30+5:30
पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले.
नवी दिल्ली - येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. भारतातला हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. त्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारीच्या आधी ११ दिवस विशेष धार्मिक विधीची सुरुवात केली आहे. या ११ दिवसांत पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या मंदिरात दर्शन घेताना दिसून येत आहेत. त्यात धावपळीच्या दिनक्रमातही पंतप्रधान मोदी या खास विधींच्या नियमांचे कठोर पालन करताना दिसत आहेत.
माहितीनुसार, ११ दिवसांच्या या कालावधीत पंतप्रधान मोदी केवळ नारळ पाणी पित आहेत. त्याचसोबत जमिनीवर चटई टाकून झोपत आहेत. पंतप्रधान या काळात केवळ फलाहार आणि दूधापासून बनलेल्या गोष्टी खाऊ शकतात. त्यांना जमिनीवर झोपावे लागणार आहे असं राम मंदिराचे पुजाऱ्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. १२ जानेवारीपासून पंतप्रधान मोदींनी या नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. त्यात पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले आणि भजनात दंग झाले.
जमिनीवर झोपण्याचे फायदे काय?
आयुर्वेदानुसार, जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर झोपल्याने माणसाला श्वासोच्छवास सुलभ होतो. यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो. जमिनीवर झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. शरीराची मुद्राही योग्य राहते. जे जमिनीवर झोपतात त्यांना पाठदुखीसारखी समस्या होत नाही. तथापि, जेव्हा तुम्ही उशीशिवाय झोपता तेव्हा जमिनीवर झोपण्याचे फायदे जास्त असतात असं आयुर्वेदाचे डॉक्टर भारत भूषण यांनी सांगितले.
तर थंडीच्या काळात अनेक लोक नारळ पाणी पित नाहीत. परंतु या काळात नारळ पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. कारण त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, सोडियम आणि इतर अनेक घटक असतात. विशेष म्हणजे यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यामुळे ते प्यायल्याने शरीरात हायड्रेशनची कमतरता होत नाही. हिवाळ्यात नारळाचे पाणी प्यायचे असेल तर ते दुपारी प्या. वातावरण थंड असलं तरी अशा वेळी नारळ पाणी प्यायल्याने कोणतीही हानी होत नाही असं आयुर्वेदात सांगितले आहे. परंतु जर एखाद्याला सर्दी-खोकला होत असेल तर त्याने डॉक्टर किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच सेवन करावे.