पाकिस्तानला दणका; सार्क संमेलनाचं निमंत्रण भारतानं फेटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 09:24 AM2018-11-28T09:24:02+5:302018-11-28T09:55:33+5:30
भारत आणि पाकिस्तानमध्ये डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडॉरवरुन सुरू असलेल्या वादादरम्यान पाकिस्तानला आणखी एक दणका मिळाला आहे.
नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमध्ये डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडॉरवरुन सुरू असलेल्या वादादरम्यान पाकिस्तानला आणखी एक दणका मिळाला आहे. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारनं पाकिस्तानचं हे निमंत्रण स्वीकारलेलं नाही.
('मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया, असं बोलणं मोदींना शोभतं का?')
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सूचना
पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सार्क संमेलनासाठी निमंत्रण पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, 2016 मध्ये झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात होणाऱ्या सार्क संमेलनावर सर्व देशांच्या बहिष्कार घातला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर यावेळेस पाकिस्तानला सार्क संमेलनाचे आयोजन करण्यासाठी आणि तेव्हाची कमतरता भरुन काढण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाहीय. दरम्यान, सार्क संमेलनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. सर्व देशांचे सदस्य मिळून संमेलनाच्या तारखेची घोषणा करतील. यानंतर सर्व देशांना निमंत्रण पाठवले जाईल.
तर दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, पाकिस्ताननं भारताला खास स्वरुपातील निमंत्रण पाठवलेले नाही, तर ही केवळ एक औपचारिक प्रक्रिया आहे.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानकडून औपचारिक निमंत्रण आल्यास त्यांची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.