डोनाल्ड ट्रम्प भारतावर 'फिदा'; म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महान अन् खूप चांगले नेते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 12:12 PM2020-04-08T12:12:45+5:302020-04-08T12:48:36+5:30
अमेरिकेला सर्वाधिक हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा भारत करणार आहे. यापूर्वी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील बंदी हाटवली नाही, तर अमेरिका कारवाईसंदर्भात विचार करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
नवी दिल्ली/वॉशिंगटन -भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीला मंजूरी दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान मोदी हे महान आणि खूप चांगले नेते आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेत सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. तेथे मंगळवारी एकाच दिवसात २ हजार जणांचा मृत्यू झाला.
फॉक्स न्यूजसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले, भारताने आपल्या जनतेचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते. पंतप्रधान मोदी हे महान नेते आहेत. भारतातून आद्याप खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी येणे बाकी आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अमेरिकेने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे 29 मिलियन डोस विकत घेतले आहेत. त्यापैकी सर्वाधिक औषधी भारतातून येणार आहे.
यापूर्वी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील बंदी हाटवली नाही, तर अमेरिका कारवाईसंदर्भात विचार करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी केला जात आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या औषधाची मागणी केली होती.
भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध उत्तम -
भारताने अमेरिकेशी चांगले संबंध राखले आहेत. त्यामुळे अमेरिका एखादे औषध मागत असल्यास त्यावरील निर्बंध कायम ठेवण्यासाठी भारताकडे कोणतेही कारण नाही, असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते. 'हा त्यांचा (पंतप्रधान मोदींचा) निर्णय असल्याचे मी कुठेही ऐकलेले नाही. त्यांनी ही औषधी इतर देशांमध्ये पाठवण्यावर निर्बंध लादले आहेत, याची मला कल्पना आहे. मी काल त्यांच्याशी संवाद साधला. आमच्यात चांगली चर्चा झाली. भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध उत्तम आहेत,' असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला पाठवण्याबद्दल विचार करू, असे पंतप्रधान मोदींनी फोनवर म्हटल्याची माहितीही ट्रम्प यांनी दिली होती. मोदींनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचं कौतुकच करू, असं ट्रम्प म्हणाले होते.
औषधासंदर्भात भारताने दिले होते उत्तर -
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले की, कुठल्याही सरकारची पहिली जबाबदारी असते ती देशातील नागरिकांची, त्यामुळे सर्वप्रथम आपल्या नागरिकांची काळजी घेणे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवणे गरजेचे आहे. म्हणूनच, काही औषध-गोळ्यांच्या निर्यातीवर बंधन आणण्यात आले होते. मात्र, सद्यपरिस्थिती पाहता सरकारने १४ विविध प्रकारच्या औषधांवरील निर्यातबंदी उठवली आहे. सध्या पॅरासिटीमॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची मोठी मागणी वाढली आहे. त्यानुसार, भारतात पुरेल एवढा स्टॉक पूर्ण झाल्यानंतर या कंपन्यांशी बोलणी करण्यात येईल, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.