Narendra Modi Birthday Plan : आईचा आशीर्वाद अन् नर्मदा आरती; 'असा' आहे पंतप्रधान मोदींच्या 69 व्या वाढदिवसाचा संपूर्ण कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 07:21 AM2019-09-17T07:21:53+5:302019-09-17T07:22:36+5:30
Narendra Modi Birthday Plan: पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेतील. त्यानंतर केवाडिया येथील कार्यक्रमाला पोहचतील
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 17 सप्टेंबर रोजी आपला 69 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. दरवेळीप्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरात या त्यांच्या राज्यांमध्ये वाढदिवस साजरा करतील. यावेळी ते नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर बंधाऱ्याची पाहणी करतील तसेच केवाडियामध्ये एका कार्यक्रमाला मोदी हजर राहणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या मातोश्री हिराबेन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी जाणार आहेत.
पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेतील. त्यानंतर केवाडिया येथील कार्यक्रमाला पोहचतील. हे ठिकाण नर्मदा जिल्ह्यात येते. याठिकाणी ते नर्मदा पूजा होईल त्यात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. पुजेनंतर नरेंद्र मोदी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील. ही जनसभा सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाला तिरंग्याच्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मोदी यांच्या दौऱ्याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ट्विट करुन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केवाडिया येथे होणाऱ्या नमामि देवी नर्मदा महोत्सवात त्यांचे स्वागत केले आहे.
Gujarat welcomes Honourable Prime Minister Shri @narendramodi ji. Greeted Honourable Prime Minister at Ahmedabad Airport with Honourable Governor Shri Acharya Devvrat ji. pic.twitter.com/jLep10doQ2
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) September 16, 2019
यासोबतच भारतीय जनता पार्टीकडूनही नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पुढील आठवडाभर देशभरात विविध कार्यक्रम राबविले जातील. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहासह अन्य पदाधिकारीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमात स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.