Narendra Modi: "तिजोरी रिकामी करू, पण घरोघरी कोरोनाची लस पोहोचवू", नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:45 PM2022-02-16T17:45:29+5:302022-02-16T17:59:37+5:30
Narendra Modi : कोरोनाच्या काळात गरिबांना मोफत लस देण्यावर आमच्या सरकारने पूर्ण लक्ष दिल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
सीतापूर : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीतापूर येथील प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशात परिस्थिती अशी होती की, तणावाशिवाय आणि कर्फ्यूशिवाय एखादा सण झाला तर लोक सुटकेचा नि:श्वास घेत होते. आता उत्तर प्रदेशातील जनतेला गुन्हेगार आणि दंगलखोरांपासून मुक्त करण्याचे काम योगी सरकारने केले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, जनतेला भाजपाला मत देण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, ज्यांनी कायद्याचे राज्य आणले त्यांना आम्ही आणले असे संपूर्ण उत्तर प्रदेश सांगत आहे.
कोरोनाच्या काळात गरिबांना मोफत लस देण्यावर आमच्या सरकारने पूर्ण लक्ष दिल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये एवढी मोठी मोहीम राबवून गरिबांना मोफत लस दिली जात नव्हती. स्वातंत्र्यानंतर हे पहिल्यांदाच घडत आहे. पूर्वीच्या सरकारांचा लसीकरण कार्यक्रम आमच्या गावापर्यंत, आदिवासी भागातही पोहोचू शकला नाही. कार्यक्रम वर्षानुवर्षे सुरू असायचे आणि लसीचा एकही डोस लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
'तिजोरी रिकामी करू, पण...'
कोरोनाची लस परदेशात चढ्या किमतीत दिली जात आहे, मात्र भारतातील भाजपा सरकारसाठी तिजोरी नव्हे तर देशवासियांचा जीव अनमोल आहे. तिजोरी रिकामी करू, पण लस घरोघरी पोहोचविणार. हे काम आम्ही केले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, गरीब माता, बहिणी आणि मुलींना दुःखापासून, उघड्यावर शौचाच्या अपमानापासून मुक्ती हवी आहे. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर माझी गरीब आई अंधाराची वाट पाहत असे. ही माझ्या गरीब आईची व्यथा, गरीब कुटुंबाची व्यथा, गरिबीतून आलेला तिचा मुलगाच जाणू शकतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
BJP in UP means control over Dangaraj, Mafiaraj, Gundaraj... & freedom to celebrate all the festivals. Having BJP in UP means protection of daughters, women from 'manchalon' (eve teasers). BJP in UP means Centre's schemes being implemented at double speed: PM Modi in Sitapur pic.twitter.com/S1mJpwUfKK
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 16, 2022
'वोकल फॉर लोकल'
याचबरोबर, भाजपा सरकारने उत्तर प्रदेशात 2 कोटींहून अधिक शौचालये बांधल्याचा दावा नरेंद्र मोदींनी केला. शौचालयाला जे 'इज्जतघर' नाव मिळाले आहे, ते उत्तर प्रदेशातील मुलींनी दिले आहे. तसेच, नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात व्होकल फॉर लोकलबाबतही बोलून दाखवले आणि सीतापूरशी असलेले त्यांचे बालपणीचे नातेही नमूद केले. ते म्हणाले की, लहान असताना त्यांच्या गावातील लोक डोळ्यांच्या उपचारासाठी सीतापूरला येत असत. आज मला सांगता येणार नाही अशी अवस्था झाली आहे. योगीजींनी 5 वर्षात सीतापूरची स्थिती सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच, व्होकल फॉर लोकल बोलले तरी विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाईट वाटते, कारण व्होकल फॉर लोकल बोलले तर त्याचे श्रेय मोदीजी, योगीजींना जाईल. कट्टर कुटुंबवाद्यांच्या विचारसरणीने वर्षानुवर्षे आपल्या कारागिरांच्या कौशल्यावर भर देण्याऐवजी परदेशातून आयात करण्याचा आग्रह धरला, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
विरोधकांवर निशाणा
ऊस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांवर मिलच्या गेटसमोर लाठीमार कसा झाला, हे सीतापूरचे शेतकरी कधीही विसरू शकत नाहीत. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड ऊस कारखाने बंद करण्याचाही आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, योगी सरकार नवीन ऊस कारखाने काढत आहे आणि जुन्या कारखान्यांची क्षमता वाढवत आहे, असे सांगत त्यांनी दावा केला की 2007-2017 या 10 वर्षात त्यांनी (सफा-बसपा सरकारने) यूपीच्या तरुणांना 2 लाखांपेक्षा कमी सरकारी नोकऱ्या दिल्या. योगीजी सरकारने 5 वर्षात 4.5 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत.