नरेंद्र मोदींनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, लोकसभा निवडणुकीसह 'या' मुद्द्यांवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 07:01 PM2023-05-28T19:01:08+5:302023-05-28T19:02:06+5:30
या बैठकीत नरेंद्र मोदींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पक्षाच्या मुख्यालयात भारतीय जनता पक्ष (भाजप) शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना राज्यांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. याशिवाय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, नागालँडचे उपमुख्यमंत्री यानथुंगो पॅटन, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनीही बैठकीला हजेरी लावली.
Visuals from BJP CM Conclave being held at party headquarters in New Delhi. pic.twitter.com/DDpXYmzP3P
— BJP (@BJP4India) May 28, 2023
नवीन संसद भवन देशाला समर्पित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या मुख्यालयात मुख्यमंत्र्यांच्या परिषदेची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'अमृत काल' देशाला नवी दिशा देईल आणि नवीन संसद भवन हे देशाच्या दृष्टी आणि नव्या भारताच्या संकल्पाचे एक उज्ज्वल उदाहरण असले पाहिजे. नवीन इमारतीच्या बांधकामामुळे 60,000 हून अधिक मजुरांना रोजगार मिळाला आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी डिजिटल गॅलरी तयार करण्यात आली आहे.