“काँग्रेस युवराजने काशीच्या मुलांना व्यसनी म्हटलेय, हा अपमान विसरता येणार नाही”: PM मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 04:41 PM2024-02-23T16:41:33+5:302024-02-23T16:44:10+5:30
PM Modi Varanasi Visit: जे स्वतः शुद्धीत नाहीत, ज्यांची संवेदना संपुष्टात आली आहे, ते काशीतील तरुणांना व्यसनी म्हणत आहेत, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर पलटवार केला.
PM Modi Varanasi Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदीवाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी बनास डेअरी प्लांटसह १०,९७२ कोटींच्या २३ विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. ३,३४४ कोटी किमतीच्या १२ पेक्षा अधिक प्रकल्पांची पायाभरणी केली. अमूलच्या सर्वात मोठ्या प्लांटचे, काशी बनास डेअरी कॉम्प्लेक्सचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावरून जोरदार पलटवार केला.
काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन झाल्यापासून रिक्षा चालक, फुल विक्रेते आणि होडीचालक यांच्या रोजगारात वाढ झाली आहे. घराणेशाहीमुळे उत्तर प्रदेशचा विकास थांबला होता. घराणेशाहीने तरुणांचे भविष्य बिघडवले आहे. काँग्रेसच्या राजघराण्याचे युवराज म्हणतात की, काशीचे तरुण व्यसनाधीन आहेत. बोलताना त्यांना आता भानही राहिलेले नाही. माझ्या काशीतील तरुणांना अंमली पदार्थांचे व्यसनी म्हणून संबोधत आहेत. आता त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. त्यांना तरुणांच्या प्रतिभेची भीती वाटते. काशी आणि अयोध्येचे बदलले स्वरुप हे त्यांच्या रागाचे मुख्य कारण आहे. काशी आणि अयोध्येचे नवे रूप, जे त्यांना आवडत नाही, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
हा अपमान विसरता येणार नाही
जे स्वतः शुद्धीत नाहीत, ज्यांची संवेदना संपुष्टात आली आहे, ते काशी, यूपीच्या मुलांना अंमली पदार्थांचे व्यसनी म्हणत आहेत. येथील तरुणाई विकसित यूपी बनवण्यात व्यस्त आहे, हे लक्षात ठेवा. इंडिया आघाडीने यूपीतील तरुणांचा केलेला अपमान कधीही विसरता येणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ते प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एकत्र येतात आणि निकाल शून्य आला की, एकमेकांना शिव्या देऊन वेगळे होतात, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला.
दरम्यान, ५०० वर्षांचा प्रभू श्रीरामांचा वनवास संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलला प्रभूंना विराजमान केले. दूरदृष्टीने, वचनबद्धतेने राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला. यानंतर ते प्रथमच वाराणसीत आले आहेत. बनास डेअरीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशने दूध उत्पादनात मोठे पाऊल उचलले आहे. आता गोमातेचे संरक्षण होणार आहे. पंतप्रधानांनी १० वर्षात काशीला ४५ हजार कोटींच्या योजना दिल्या आहेत. हा पंतप्रधान मोदींचा नवा भारत आहे, जो आदर, समृद्धी आणि विश्वासाचा सन्मान करेल. विकसित भारताच्या संकल्पाने देशवासीयांना जोडणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देशाला जगात ओळख मिळवून दिली आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.